पोलीस विभागाचा उपक्रम : विद्यार्थ्यांना फराळ, शैक्षणिक साहित्य, कपड्यांची अनोखी भेटधानोरा : तालुक्यातील गोडलवाही येथील पोलीस मदत केंद्राच्या वतीने पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गोडलवाही येथील शासकीय आश्रमशाळेत जाऊन विद्यार्थ्यांसमावेत आगळीवेगळी दिवाळी बुधवारी साजरी केली. यावेळी पोलीस मदत केंद्राच्या वतीने आश्रमशाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षकांना तसेच ग्रामस्थांना चिवडा व गोड पदार्थाचे वाटप करण्यात आले. तसेच शुभेच्छा कार्डही देण्यात आले. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना कपड्याचे वाटप करून त्यांच्या आईवडिलांनाही दिवाळी सणानिमित्त कपडे भेट देण्यात आले. त्यानंतर आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसोबत पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मिळून फटाके फोडली. अशा प्रकारे आगळीवेगळी दिवाळी साजरी करण्याचा उपक्रम पोलीस मदत केंद्राच्या वतीने यंदा प्रथमच राबविण्यात आला. दिवाळीच्या सुटीपूर्वीच भेटवस्तू मिळाल्याने विद्यार्थी आनंदाने भारावून गेले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी व्यंकट सरडे, पोलीस उपनिरीक्षक किशोरकुमार खाडे, पोलीस उपनिरीक्षक गजानन घोटे, आश्रमशाळेचे मुख्याध्यापक खोब्रागडे तसेच शिक्षवृंद व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी थेट आश्रमशाळेत येऊन विद्यार्थ्यांसमावेत दिवाळीचा सण साजरा केल्याने मुला-मुलींच्या चेहऱ्यावर आनंद व उत्साह झळकत होता. फटाके फोडण्याचा आनंदही विद्यार्थ्यांनी लुटला. (तालुका प्रतिनिधी)
गोडलवाही आश्रमशाळेत आगळीवेगळी दिवाळी साजरी
By admin | Updated: October 29, 2016 01:57 IST