काँग्रेस कार्यकर्त्यांची पक्ष नेतृत्वाकडे मागणीगडचिरोली : थेट नगराध्यक्ष पदाची निवडणूक असल्याने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडे गडचिरोली शहरात एकही सक्षम महिला उमेदवार दिसून येत नाही. त्यामुळे गडचिरोली येथे काँग्रेसचे विधानसभेतील उपनेते आ. विजय वडेट्टीवार यांच्या पत्नी किरण वडेट्टीवार यांना उमेदवारी पक्षातर्फे देण्यात यावी, अशी मागणी गडचिरोलीतील शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या केंद्रीय व राज्य नेतृत्वाकडे केली असल्याची माहिती गडचिरोलीचे माजी नगराध्यक्ष अॅड. राम मेश्राम यांनी लोकमतशी बोलताना दिली.१८ डिसेंबर रोजी गडचिरोली नगर पालिकेची निवडणूक होत आहे. यंदा नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडला जाणार आहे. गडचिरोली शहरात ओबीसी महिला प्रवर्गासाठी नगराध्यक्षपद राखीव आहे. दोन दिवसांपूर्वी काँग्रेस पक्षातर्फे इच्छुक नगरसेवक व नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. मात्र यात एकही सक्षम उमेदवार असल्याचे दिसून आले नाही. या बाबीचा विचार करून गडचिरोली शहरातील शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या अखिल भारतीय अध्यक्ष सोनिया गांधी, उपाध्यक्ष खा. राहुल गांधी, प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्याकडे गडचिरोलीतून किरण विजय वडेट्टीवार यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. किरण वडेट्टीवार यांना उमेदवारी मिळाल्यास काँग्रेसला गडचिरोली नगर पालिकेत घवघवीत यश मिळेल, असा विश्वास अॅड. राम मेश्राम यांनी व्यक्त केला आहे. या संपूर्ण घटनाक्रमाबाबत आ. विजय वडेट्टीवार यांना विचारणा केली असता, कार्यकर्त्यांकडून प्रचंड मोठा दबाव यासंदर्भात येत आहे. ही कार्यकर्त्यांची मागणी व भावना आहे. मात्र आपण काँग्रेस पक्षाच्या जबाबदार पदावर काम करीत असल्यामुळे याबाबतचा निर्णय काँग्रेस पक्षाच्या हायकमांडला घ्यायचा आहे. त्यांनी जर आपल्याला सूचना केली तर याबाबत विचार करता येईल, असे ते म्हणाले. गडचिरोली शहरात नगर परिषदेतील विद्यमान सत्ताधारी व भाजपप्रती प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे सर्वसामान्य मतदार व काँग्रेस कार्यकर्त्यांना काँग्रेसची सत्ता पालिकेत यावी, अशी इच्छा आहे. व हे वाटणे स्वाभाविकही बाब आहे, असे आ. वडेट्टीवार म्हणाले. (जिल्हा प्रतिनिधी)
काँग्रेसकडून गडचिरोलीत किरण वडेट्टीवार यांना उमेदवारी द्या
By admin | Updated: October 29, 2016 01:50 IST