कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र, सोनापूर-गडचिरोली आणि महिला आर्थिक विकास महामंडळ, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक आदिवासी दिन तथा क्रांती दिनानिमित्त रानभाजी महोत्सव सप्ताह ९ ते १५ ऑगस्टपर्यंत कृषी विज्ञान केंद्र, सोनापूर येथे आयोजित करण्यात आला आहे. पहिल्या दिवशी ऑनलाइन उद्घाटन करताना ना. शिंदे बाेलत हाेते. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून कृषिमंत्री दादाजी भुसे, राेजगार हमी याेजना व फलाेत्पादनमंत्री संदीपान भुमरे, कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, फलाेत्पादन राज्यमंत्री अदिती तटकरे, कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले आदी मान्यवर ऑनलाइन सहभागी झाले. या महोत्सवाला अकाेले येथील पद्मश्री बीजमाता राहीबाई पोपरे, डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे शिक्षण विस्तार संचालक डॉ. विलास खर्चे, संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावतीचे संशाेधक व आहारतज्ज्ञ डॉ. रुपल वाघ, कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक तथा आत्माचे प्रकल्प संचालक डाॅ. संदीप कऱ्हाळे, माविमच्या वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी कांता मिश्रा, उपविभागीय कृषी अधिकारी बालाजी कदम, उपजिल्हा कृषी अधिकारी वसवाडे, तहसीलदार महेंद्र गणवीर, आत्माचे उपसंचालक आबा धापते, तालुका कृषी अधिकारी प्रदीप वाहने, सहयाेगी प्राध्यापक डॉ. आर.एस. वाघमारे, प्रगतशील शेतकरी प्रतीभा चौधरी व बचत गटाचे सदस्य उपस्थित हाेते. कार्यक्रमादरम्यान वंदना गावडे व छाया वैरागडे यांच्यासोबत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑनलाइन संवाद साधला. महाेत्सवात रानभाजी तसेच मूल्यवर्धित पदार्थांचे दालन लावण्यात आले. यामध्ये गडचिराेली जिल्ह्यातील ५८ प्रकारच्या विविध रानभाज्या ठेवण्यात आल्या. तसेच बचत गटांमार्फत रानभाज्यांचे विविध पदार्थ विक्रीकरिता ठेवण्यात आले हाेते.
बाॅक्स
रानभाज्यांची मागणी वाढल्यास राेजगार उपलब्ध
रानमेवा कोणता, या रानमेव्यामध्ये नेमके काय वैशिष्ट्य आहे? त्याचा आरोग्याशी संबंध, फायदे त्या भाजीची चव आदींची माहिती उपलब्ध झाली तर निश्चितच प्रत्येक कुटुंबातील स्त्री एक वेळ तरी दैनंदिन आहारामध्ये रानभाजीचा समावेश केल्याशिवाय राहणार नाही. पर्यायाने रानभाज्यांची मागणी वाढल्यास शेतकऱ्यांना तसेच ग्रामीण भागातील लोकांना रोजगार मिळून आर्थिक स्तर उंचावण्यास मदत होईल. नैसर्गिकरीत्या उगवणाऱ्या पौष्टिक व औषधीयुक्त रानभाज्यांच्या माध्यमातून आराेग्य सदृढ राहण्यास मदत हाेते. त्यामुळे या रानभाज्यांचे संवर्धन व जनजागृती होण्याकरिता ‘रानभाजी महोत्सव’ महत्त्वपूर्ण आहे, असे प्रतिपादन बीजमाता राहीबाई पाेवरे यांनी केले.
बाॅक्स
जीवनसत्वांची गरज रानभाज्यांतून भागवणे शक्य
आपल्या आहारात पिष्टमय, नत्रयुक्त, चरबीयुक्त, क्षार, जीवनसत्वे व पाणी हे घटक आहेत. त्यापैकी क्षार व जीवनसत्वे आपल्याला ताज्या रानभाज्यांमधून मिळतात. आपल्या शरीराच्या वाढीसाठी क्षार व जीवनसत्वे गरजेची आहेतच; पण आपल्या आहारातील इतर घटकांच्या पोषणासाठीही त्यांची गरज असते. प्रथिनांच्या पचनासाठी ‘अ’ जीवनसत्व, कर्बोदकांच्या पचनासाठी ‘ब’ जीवनसत्व, तर स्निग्ध पदार्थांच्या पचनासाठी ‘ई’ जीवनसत्वाची गरज असते. शिवाय हाडांच्या बळकटीसाठी ‘ड’ जीवनसत्व, रक्ताची घनता ठरावीक प्रमाणात ठेवण्यासाठी ‘के’ जीवनसत्व आणि या सर्वांना सावरणारे असे ‘क’ जीवनसत्व आपल्याला आहारातून मिळणे गरजेचे असते. या जीवनसत्वांची गरज आपण विविध रानभाज्यांमधून भागवू शकतो, असे प्रतिपादन डाॅ. रुपल वाघ यांनी केले.