गडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टीने धानपीक सडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 11:11 AM2019-08-17T11:11:41+5:302019-08-17T11:16:11+5:30

पाण्याच्या वेगवान प्रवाहातील माती, रेती, दगड यांनी गडचिरोली जिल्ह्यात उभे धानपीक पार वाहून नेले तर काही शेतात पाणी प्रवाहात पाण्यासोबतचे गाळ, वाळू धानपिकावर पसरल्याने धान सडून गेले आहे.

In Gadchiroli district, the paddy crop was damaged by heavy rains | गडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टीने धानपीक सडले

गडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टीने धानपीक सडले

Next
ठळक मुद्देमंगळवार, बुधवारी बरसला धोधो पाऊसशेताला जलाशयाचे रूप गाढवी नदी, नाल्याच्या काठावरील धानशेतीचे नुकसान

अतुल बुराडे
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली: पाऊस, अती कमी आला वा अती जास्त आला तरीही धानशेतीचे नुकसान होणार हे समीकरण ठरले आहे. चालू आठवड्यातील सोमवारच्या रात्री, मंगळवारी दिवसभर तसेच रात्रीही जोराचा पाऊस कोसळला. याआधी फक्त दोन-चार दिवस कोरडे गेले होते. त्यापूर्वी सुद्धा पंधरा-वीस दिवस पावसाची झळ सुरूच होती. त्यामुळे गाढवी नदी, नाले, बोड्या, तलाव, शेतातील बांध्यांमध्ये पाणी होतेच. परिणामस्वरूप या आठवड्यात आलेल्या धोधो पावसाने जलसाठ्यात आणखी मोठ्या प्रमाणात वाढ झाली. गाढवी नदीतील पाणी वाढल्याने नदीच्या काठालगतच्या शेतात नदीचे पाणी शिरले. गाढवी नदीचा जलस्तर वाढला की या नदीला येऊन भेटणारे एकलपूर-विसोरा, विसोरा-तुळशी, शंकरपुर-चोप, शंकरपुर-विठ्ठलगाव, पोटगाव-विहिरगाव या मार्गावरील सर्व लहान-मोठ्या नाल्यांचे पाणी स्थिर होते. पाणी स्थिर झाल्याने नाल्याचे पाणी नाल्याच्या चहुकडे पसरून जणू सरोवराचे रुपडे तयार झाले होते. त्यामुळे या सर्व नाल्यांच्या दोन्ही बाजूला असलेली शेती पाण्यात बुडाली. धानपीक पाण्यात बुडून राहिल्याने तसेच पाण्याच्या वेगवान प्रवाहातील माती, रेती, दगड यांनी उभे धानपीक पार वाहून नेले तर काही शेतात पाणी प्रवाहात पाण्यासोबतचे गाळ, वाळू धानपिकावर पसरल्याने धान सडून गेले आहे.
यावर्षी उंदीर वाहनाचा मृग नक्षत्र एकदोन सरी वगळता गेला. हत्त्यावर आरूढ होऊन आलेला आर्द्रा नक्षत्र सुरू होऊन दोन-चार दिवस झाल्यावर चांगला पाऊस पडला. याच पावसाने जूनअखेर सुरू झालेली पेरणी जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात संपली. आद्रार्ची शेवट पण चांगली झाली. ६ जुलैला सुरू झालेल्या मेंढ्यावरच्या पुनर्वसुने बळीराजाच्या डोळ्यात आसू आणले. हा नक्षत्र सर्वांत कोरडा राहिला. याच़ नक्षत्रात विसोरासह तुळशी, कोकडी, उसेगाव, विहिरगाव, शंकरपुर, कसारी भागातील धान वाफे करपले. उसेगाव येथील शेतकरी गोपल बोरकर यांनी तर ट्रँक्टर ट्रॉलीत प्लास्टिक ताडपत्री टाकून त्यात पाणी भरून धान पऱहे वाचविले. आता दुबार पेरणी करावी लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली असतांना. गाढव वाहनाचा पुष्य नक्षत्र धानाला नवजीवन देणारा ठरला. आळशी हा बिरुद मिरवणारा आणि नेहमी चेष्टेचा विषय ठरणारा गाढव यंदा मात्र हिरो झाला. पुष्य नक्षत्र असा पाऊस घेऊन आला त्यामुळे धानवाफ्यांना नवसंजीवनी मिळाली. संततधार, मुसळधार, रिमझिम असा पाऊस शेतीसह शेतकरी आणि साऱ्यांना सुखावून गेला. करपलेले धान तरले. धानपऱहे रोवणीलायक झालेल्या शेतात रोवणी सुरू झाली. जुलैच्या मध्यापर्यंत कोरडे पडलेले जलसाठे पाण्याने भरू लागले. आषाढ महिना संपून श्रावण मासारंभ होताच २ ऑगस्टला पुष्य नक्षत्र संपला. आणि श्रावण महिन्याच्या दुसऱ्याच दिवशी (३ ऑगस्ट) बेडूकचा आश्लेषा नक्षत्र लागला. बेडकाने (आश्लेषा नक्षत्र) आधीच्या गाढवाने (पुष्य नक्षत्र) सुरू केलेली पाऊसयात्रा सुरूच ठेवली. काल (१६ ऑगस्ट) संपलेला आश्लेषा नक्षत्र दमदार बरसून गेला. मात्र नुकसान सुद्धा करून गेला.
पुष्प नक्षत्राच्या पाण्याने नदी, तलाव, तलाव, बोड्या, नाले, रस्त्याकडेचे खड्डे पाण्याने शंभर टक्के भरले. त्यात आश्लेषाने पुन्हा जोरदार एन्ट्री मारली आणि सर्व जलस्त्रोत ओवरफ्लो झाले. पाऊस येतच राहिला आणि साचलेल्या नदी, नाल्यातील अतिरिक्त पाणी काठावरील शेतात घुसले आणि धानाची नासाडी झाली. विसोरा जवळून वाहणाऱ्या गाढवी नदी किनाऱ्यावरील धानशेतीचे नुकसान झाले आहे. विहिरगाव ते पोटगाव दरम्यानच्या नाल्याकडेचे शेकडो हेक्टर धान पाण्यात बुडून राहिल्याने नष्ट झाले आहे. पुनर्वसु नक्षत्रात पावसाने दडी मारल्यामुळे आधीच करपलेले धानपऱहे पुष्य नक्षत्राच्या पाण्याने कसेबसे वाचले. रोवणी झाली आणि आता ही अतिवृष्टी झाल्याने धान सडून गेले त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. झालेल्या नुकसानीची पाहणी करून शासनाकडून नुकसानभरपाई मिळण्याची मागणी विहिरगाव येथील शेतकरी बांधवांनी केली आहे.
विहिरगाव येथील दिनकर करंबे, नामदेव भुते, पांडुरंग पत्रे, मंसाराम दोनाडकर, गौतम शेंडे, मनोहर नाकतोडे, गोपीनाथ ठाकरे, दिवाकर दोनाडकर, विनायक गुरुनुले या शेतकऱ्यांच्या शेतातील धानपिक पुराच्या पाण्याने नष्ट झाले आहे.

यंदा पाऊस लेट आला. आमची शेती वरथेंबी पावसावर अवलंबून असल्याने धान पेरणी उशिरा झाली. मागच्या महिन्यात सुरुवातीला पाऊस नाही आला त्यामुळे धान वाळले पण मग पाऊस आला. धानपऱहे वाचले. आता रोवणी झाल्यावर हा मोठा पाऊस पडला. धान पाण्याखाली राहिला म्हणून धानपीक खराब झाले. सरकारने नुकसानभरपाई द्यावी
प्रविण दोनाडकर
शेतकरी, विहिरगाव

Web Title: In Gadchiroli district, the paddy crop was damaged by heavy rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती