६० हजारांचे नुकसान : गोवर्धन येथील साहित्य जळाले लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : देसाईगंज तालुक्यातील कोरेगाव चोप, गडचिरोली तालुक्यातील गुरवळा व चामोर्शी तालुक्यातील गोवर्धन येथे शुक्रवारी वीज पडून चार जण जखमी झाल्याची घटना घडली. कोरेगाव चोप शेतशिवारात वीज पडल्याने सचिन प्रभू लंजे, भगवान मोतीराम मस्के व संदीप मोतीराम मस्के हे जखमी झाले. कुनघाडा (रै.) ग्राम पंचायतअंतर्गत येणाऱ्या गोवर्धन येथे वीज पडल्याने सोमेश्वर केशव खांडेकर हे जखमी झाले. त्याचबरोबर त्यांच्या घरातील टीव्ही, विद्युत मीटर, दोन सिलिंग फॅन जळाले. यामुळे खांडेकर यांचे जवळपास २० हजार रूपयांचे नुकसान झाले. त्याचबरोबर दिलीप केशव खांडेकर यांच्याही घरातील टीव्ही, तीन सिलिंग फॅन, टीव्ही रिसिव्हर जळाल्याने २५ हजार रूपयांचे नुकसान झाले. सुरेश केशव खांडेकर यांच्या घरातीलही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जळाल्याने त्यांचेही १५ हजार रूपयांचे नुकसान झाले. गडचिरोली तालुक्यातील गुरवळा येथे गुरूवारी रात्री १० वाजताच्या सुमारास बंडू मोतीराम निमगडे यांच्या घरावर वीज कोसळली. यामुळे निमगडे यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषद सदस्य वैशाली ताटपल्लीवार यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. प्रशासनाने नुकसानीचा पंचनामा केला आहे. नुकसानग्रस्तांना तत्काळ आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
वीज पडून चार जण जखमी
By admin | Updated: June 25, 2017 01:32 IST