अहेरी (गडचिरोली) : माजी राज्यमंत्री तथा गडचिरोलीचे माजी पालकमंत्री अंब्रिशराव आत्राम यांच्या सुरक्षा रक्षकाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. त्याने सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडून आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास अहेरी येथील 'रुक्मिणी महल' या अंब्रिशराव यांच्या बंगल्याच्या आवारात घडली.
हितेश भैसारे (अंदाजे ३७ वर्ष) असे मृत गार्डचे नाव असून ते अहेरी येथील प्राणहिता पोलीस उपमुख्यालयात पोलीस नायक म्हणून कार्यरत होते. रुक्मिणी महल येथे कर्तव्यावर असताना त्यांनी आपल्या छातीवर गोळी झाडून घेतल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे ते तिथेच कोसळून मरण पावले.
माहिती मिळताच पोलिसांनी तिकडे धाव घेतली. दरम्यान भैसारे यांनी घरगुती कारणातून आत्महत्या केल्याची शक्यता उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.