संरक्षणाबरोबरच सेवेवर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2018 12:11 AM2018-04-01T00:11:57+5:302018-04-01T00:11:57+5:30

दुर्गम भागातील नागरिकांचा विकास झाल्यास नक्षल चळवळ आपोआप संपुष्टात येईल या उद्देशाने शासन नागरिकांना संरक्षण देण्याबरोबरच सेवा व रोजगार उपलब्ध करून देण्यावर विशेष भर देत आहे.

Focus on service along with protection | संरक्षणाबरोबरच सेवेवर भर

संरक्षणाबरोबरच सेवेवर भर

Next
ठळक मुद्देगृह राज्यमंत्र्यांचे प्रतिपादन : नागरी कृती कार्यक्रमांतर्गत साहित्याचे वितरण

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : दुर्गम भागातील नागरिकांचा विकास झाल्यास नक्षल चळवळ आपोआप संपुष्टात येईल या उद्देशाने शासन नागरिकांना संरक्षण देण्याबरोबरच सेवा व रोजगार उपलब्ध करून देण्यावर विशेष भर देत आहे. याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.
सीआरपीएफ व पोलीस विभाग यांच्या वतीने दुर्गम भागातील नागरिकांना रोजगाराचे प्रशिक्षण देण्यात आले. या युवकांना प्रमाणपत्र व साहित्याच्या वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हंसराज अहीर होते. यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय परिवहन, भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आदिवासी विकास राज्यमंत्री तथा पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम, खासदार अशोक नेते, जिल्हा परिषद अध्यक्ष योगीता भांडेकर, आमदार डॉ.देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, ज्येष्ठ सहकार नेते अरविंद पोरेड्डीवार, नगराध्यक्ष योगीता पिपरे, अतिरिक्त पोलीस महासंचालक कनकरत्नम, सीआरपीएफचे पोलीस महानिरिक्षक राजकुमार, पोलीस उपमहानिरिक्षक टी.शेखर, पोलीस उपमहानिरिक्षक अंकुश शिंदे, प्रभारी पोलीस अधीक्षक राजा रामासामी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, सीआरपीएफ १९१ बटालियनचे कमांडंट प्रभाकर त्रिपाठी, सीआरपीएफ १९२ बटालियनचे कमांडंट मनोजकुमार आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना हंसराज अहीर म्हणाले, सीआरपीएफ व पोलीस जवान अतिशय हिमतीने नक्षल्यांचा सामना करीत आहेत. त्यामुळेच नक्षल चळवळीला अखेरची घरघर लागली आहे. महाराष्टÑात गडचिरोली वगळता नक्षल चळवळ संपली आहे. येत्या काही वर्षात गडचिरोली जिल्ह्यातून सुध्दा नक्षल चळवळ हद्दपार होईल. केंद्र व राज्य शासन सामान्य जनतेच्या विकासासाठी अनेक योजना राबवित आहे. मात्र या योजनांची अंमलबजावणी करताना नक्षल चळवळीमुळे अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे नागरिकांना सुरक्षा उपलब्ध करून देण्याबरोबरच येथील पोलीस जवान प्रत्येक नागरिकांच्या दारापर्यंत शासकीय योजना पोहोचविण्याचेही काम करीत आहेत. जिल्ह्यात रस्ते व पुलांचे बांधकाम झाले आहे. याचा मोठा फटका नक्षल चळवळीला बसला आहे, असे प्रतिपादन केले.
प्रास्ताविकात सीआरपीएफचे पोलीस महानिरिक्षक राजकुमार यांनी नागरी कृती कार्यक्रमांतर्गत राबवित असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. या उपक्रमासाठी शासनाकडून १ कोटी ३० लाख रूपये प्राप्त झाले. या निधीतून ३० कुटुंबांना बकऱ्यांचे वितरण, २५ कुटुंबांना मत्स्य बीज वितरण, १०० कुटुंबांना कोंबड्यांचे वितरण, २५० महिलांना टेलरींगचे प्रशिक्षण व २०० युवकांना एमएससीआयटीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. कार्यक्रमाप्रसंगी शिलाई मशीन, एमएससीआयटीचे प्रमाणपत्र, वाहन दुरूस्तीचे साहित्य मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले. या कार्यक्रमाला दुर्गम भागातील नागरीक उपस्थित होते.
दुग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी मदर डेअरीची स्थापना करणार-गडकरी
विदर्भात हिरवा चारा उपलब्ध असल्याने दुग्ध व्यवसायासाठी अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात मदर डेरी स्थापन केली जाणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातही सदर डेअरी स्थापन केली जाईल. देशात बहुतांश कागद आयात केला जातो. गडचिरोली जिल्ह्यातील जंगलात मोठ्या प्रमाणात बांबू उपलब्ध आहे. सदर बांबू ग्रामसभांनी पेपरमिलला पुरवठा केल्यास हजारो युवकांना रोजगार उपलब्ध होईल. मोहापासून डिझेल बनविण्यासाठीच्या प्रकल्पाचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने सादर करावा. त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. धानाच्या तणसीपासून इथेनॉल बनविता येते. हा सुध्दा उद्योग गडचिरोली जिल्ह्यात स्थापन करण्यासाठी वाव आहे. सध्या जिल्ह्यात १२ हजार कोटींची कामे सुरू आहेत. नक्षल्यांना गोळी बरोबरच रोजगारानेही उत्तर देण्याचा प्रयत्न शासन करीत आहे, असे प्रतिपादन नितीन गडकरी यांनी केले.
 

Web Title: Focus on service along with protection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.