गडचिरोली : जिल्ह्यात मागील आठ दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे एसटी महामंडळाच्या उत्पन्नाला फटका बसला. गडचिरोली व अहेरी आगाराच्या अनेक बसफेऱ्या बंद राहिल्यामुळे जवळपास १३ लाख ५० हजार रूपयांचा तोटा दोन्ही बस आगाराला सहन करावा लागला. जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे दुर्गम भागासह शहरी भागातीलही अनेक मार्ग तीन ते चार दिवस बंद होते. या भागातील वाहतूक पूर्णत: ठप्पच होती. त्यामुळे गडचिरोली आगाराचे अंदाजे ३ लाख ५१ हजार रूपये तर अहेरी आगाराला १० लाख रूपयांचा तोटा सहन करावा लागला. गडचिरोली-नागपूर मार्गावरील कठाणी नदीला पूर आल्याने रविवारपासून सोमवारी दुपारी ३ वाजेपर्यंत नदीच्या पुलावरून पाणी वाहत होते. त्यामुळे नागपूरमार्गे जाणाऱ्या अनेक बसेस बंद होत्या. या मार्गावरील एकूण ४४ बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या. यात गडचिरोलीवरून २२ तर नागपूरवरून येणाऱ्या २२ बसफेऱ्यांचा समावेश होता. गडचिरोली-अहेरी, गडचिरोली- कुरखेडा मार्गावरील अनेक नाल्यांवरील पुलांवरून पाणी वाहत असल्याने या मार्गावरील अनेक बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या. या मार्गावरील १३ बसफेऱ्या रद्द झाल्याची माहिती आहे. ३१ आॅगस्ट रोजी एम. एच. ४० एन ९३८१ ही बस गडचिरोली-अहेरी- आसरअल्ली मार्गे गेली होती. मात्र सिरोंचा-अंकिसा मार्गावरील येर्रावागू नाल्यावरील पूल वाहून गेल्याने तब्बल १० दिवसांपासून सदर बस आसरअल्ली येथील पोेलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आली आहे. अहेरी आगारातील ४० हजार किमीच्या बसफेऱ्या रद्द करावे लागल्याने आगाराचे तब्बल १० लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. रस्ता वाहून गेल्याने अहेरी आगाराची आसरअल्ली- रेगुंठा बस मागील तीन ते चार दिवसांपासून अडकली आहे. अहेरी- भामरागड-कोठी, अहेरी-देवलमरी, अहेरी-गट्टा, अहेरी-आसरअल्ली, अहेरी-झिंगानूर या मार्गावरील बसेस पुरामुळे बंद आहेत. अहेरी-देवलमरी मार्ग मंगळवारपर्यंत बंदच होता. या मार्गावरील पुलाचे मधले खांब तुटल्याने आगारामार्फत या मार्गे बस सुरू करण्यात आली नाही. मागील एक वर्षापासून सदर पुलाची दुरूस्ती करण्याची मागणी नागरिकांनी लावून धरली होती. परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाने जाणूनबुजून दुर्लक्ष केल्याने या मार्गावरील पुलाच्या दुरूस्तीचा प्रश्न अजुनही प्रलंबितच आहे. अहेरी-बामणपल्ली हे २० किमीचे अंतर पार करण्यासाठी तब्बल दीड तासांचा कालावधी लागत असल्याने एसटी महामंडळाला तोटा सहन करावा लागत आहे. एकूणच रस्ते व पुरामुळे बस आगाराला आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.
पुरामुळे साडेतेरा लाखांचा तोटा
By admin | Updated: September 10, 2014 23:40 IST