लखमापूर बोरी शाळेचा उपक्रम : विविध वृक्षांची केली लागवडलखमापूर बोरी : चामोर्शी पंचायत समिती अंतर्गत लखमापूर बोरी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळेच्या आवारात मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थ्यांनी परिश्रमातून विविध जातीच्या झाडांची लागवड करून बालोद्यान फुलविले आहे.लखमापूर बोरी या जि.प. शाळेत इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या शिक्षणाची सोय असून या शाळेत मुख्याध्यापकांसह आठ शिक्षक व चार शिक्षीका कार्यरत आहेत. शाळेला तीन एकर धानपिकाची शेतजमीन आहे. या शाळेत व्यायामशाळा, वाचनालय आदी सुविधा आहे. येथील मुख्याध्यापक व शिक्षकांनी इच्छाशक्तीच्या जोरावर विद्यार्थ्यांच्या सहकार्याने शाळेच्या परिसरात प्रशस्त बालोद्यान फुलविले आहे. दोन महिन्यांपूर्वी नाशिक येथील शिक्षण विभागाचे संचालक, गडचिरोली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता, जि.प. अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे, जीवन नाट यांनी भेट देऊन शाळेची पाहणी केली. शिक्षक व विद्यार्थ्यांच्या पुढाकारातून शाळेत फुलविण्यात आलेले बालोद्यानाबाबत या सर्वांनी शाळेचे कौतुक केले होते.शाळेतील बालोद्यानाकरिता येथे पाणी पुरवठ्यासाठी पाईपलाईन टाकण्यात आली आहे. तसेच ठीबक व तुषार सिंचनाची व्यवस्था केली आहे. भर उन्हाळ्यातही या शाळेतील विविध प्रजातीच्या झाडाने फुललेले बालोद्यान हिरवेगार दिसत असते.सानेगुरूजी स्वच्छ शाळेच्या पुरस्काराची मानकरीलखमापूर बोरी येथील जि.प. उच्च प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांच्या सहकार्यातून रोज परिसर स्वच्छता करण्यात येते. शाळेतील बालोद्यान, परिसर स्वच्छता व गुणवत्ता पाहून या शाळेला सानेगुरूजी स्वच्छ शाळा हा विभागीयस्तरावरील पुरस्कार प्राप्त झाला आहे. या पुरस्कारामुळे जिल्ह्यासह नागपूर विभागात लखमापूर बोरी गावाचा नावलौकिक झाला आहे.
परिश्रमातून फुलविले बालोद्यान
By admin | Updated: July 16, 2015 02:11 IST