पत्रकार परिषद : मुस्लीम वेल्फेअर सोसायटीची मागणीलोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : लहान बालकाच्या मृत्यू प्रकरणी डॉ. प्रविण किलनाके हे चौकशी समितीमध्ये दोषी आढळून आल्याने आरोग्य विभागाने त्यांना निलंबित करून त्यांना वाशिम जिल्ह्यात नेमणूक देण्यात आली आहे. लहान बालकाच्या मृत्यूसाठी डॉ. किलनाके हे जबाबदार असल्याने त्यांच्यावर आता मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मुस्लीम वेल्फेअर सोसायटीच्या सदस्यांनी केली आहे.अहेरी येथील गर्भवती महिला शमीम सुलतान अब्दुल शगीर शेख या गर्भवती मातेचा वेळेवर सिजर करण्यात आला नाही. त्यामुळे त्यांचा बाळ पोटातच दगावला. त्यानंतर आॅपरेशन करून बाळ पोटातून काढण्यात आले. याबाबतची तक्रार मुस्लीम वेल्फेअर सोसायटीने आरोग्य विभागाकडे केली होती. त्यानंतर आरोग्य विभागाने जिल्हा व विभागीय स्तरावरील दोन चौकशी समित्या नेमल्या होत्या. या दोन्ही चौकशी समित्यांनी डॉ. प्रविण किलनाके व डॉ. उज्वला बोरकर यांना दोषी ठरविले होते. त्यामुळे या दोन्ही डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. डॉ. उज्वला बोरकर यांना अमरावती येथे नेमणूक देण्यात आली आहे. डॉ. प्रविण किलनाके हे त्यांची आई पद्मनी सुखदेव किलनाके यांच्या नावाने नोंदणी असलेले वात्सल्य शुश्राषालय मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटल चालवत होते. या रूग्णालयाची नोंदणी १ एप्रिल २०१३ ते ३१ मार्च २०१४ पर्यंत होती. त्यानंतर तब्बल अडीच वर्ष म्हणजे, १७ मे २०१६ पर्यंत किलनाके यांनी सदर रूग्णालय नोंदणी नसतानाही अवैधरितीने चालविले आहे. आई मरण पावल्यामुळे रूग्णालय चालविणे अशक्य असल्याचे १७ मे २०१६ रोजी डॉ. प्रविण किलनाके यांनी लिहून दिले आहे. याबाबतची सविस्तर चौकशी करण्याची मागणी केली आहे. पीडित महिला शमीम सुलतान अब्दुल शगीर शेख हिला शासनाकडून आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणीही पत्रकार परिषदेतून केली. पत्रकार परिषदेला संघटनेचे अध्यक्ष मोहमद मुस्तफा शेख, हाजी हबीब खान, ए. आर. पठाण, फरजान शेख, अकील शेख, आयशा अली यांच्यासह मुस्लीम वेल्फेअर सोसायटीचे सदस्य उपस्थित होते.ज्योती मेश्राम यांच्या बालकाची नोंदच नाहीगडचिरोली शहरातील गोकुलनगर येथील ज्योती चंद्रमनी मेश्राम यांच्या बाळाचा सिजर करतादरम्यान २२ आॅक्टोबर २०१६ रोजी मृत्यू झाला. मात्र मुलांच्या जन्माच्या यादीमध्ये सदर बाळाचा उल्लेखच नसल्याचे माहितीच्या अधिकारांतर्गत घेतलेल्या माहितीवरून दिसून येत आहे. याचा अर्थ अनेक बाळांची रूग्णालयात नोंदच होत नसावी, असा गंभीर आरोपही केला आहे.
किलनाकेंवर गुन्हा दाखल करा
By admin | Updated: May 9, 2017 00:47 IST