कर्मचाऱ्यांच्या मनमानीने पेट्रोेलपंप बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 12:07 AM2018-04-27T00:07:48+5:302018-04-27T00:07:48+5:30

एटापल्ली पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यासोबत एका ग्राहकाचा वाद झाल्याच्या कारणावरून एटापल्ली येथील पेट्रोलपंप ६ एप्रिलपासून अचानक बंद ठेवण्यात आला आहे. या पेट्रोलपंपाव्यतीरिक्त एटापल्ली तालुक्यात दुसरा पेट्रोलपंप नसल्याने वाहनधारकांचे हाल होत आहेत.

Employee's arbitrarily petrol pump shut | कर्मचाऱ्यांच्या मनमानीने पेट्रोेलपंप बंद

कर्मचाऱ्यांच्या मनमानीने पेट्रोेलपंप बंद

Next
ठळक मुद्देएटापल्ली तालुक्यातील वाहनधारक त्रस्त : कर्मचाºयांसोबत ग्राहकांचा वाद झाल्याचा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्क
एटापल्ली : एटापल्ली पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यासोबत एका ग्राहकाचा वाद झाल्याच्या कारणावरून एटापल्ली येथील पेट्रोलपंप ६ एप्रिलपासून अचानक बंद ठेवण्यात आला आहे. या पेट्रोलपंपाव्यतीरिक्त एटापल्ली तालुक्यात दुसरा पेट्रोलपंप नसल्याने वाहनधारकांचे हाल होत आहेत. पंचायत समितीच्या या मनमानी कारभाराबाबत नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
एटापल्ली हा दुर्गम व नक्षलग्रस्त भागात मोडतो. त्यामुळे या ठिकाणी पेट्रोलपंप टाकण्यास खासगी व्यावसायिक तयार नव्हते. वाहनधारकांची मागणी लक्षात घेऊन २००५ मध्ये तत्कालीन पंचायत समितीचे उपसभापती केवल अतकमवार, सभापती सपना कोडापे, संवर्ग विकास अधिकारी शालिकराम पडघन यांनी पुढाकार घेतला. तत्कालीन पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रामालो जैन व जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाकडे पाठपुरावा केला. त्यानंतर शासनाने पंचायत समितीला पेट्रोलपंप टाकण्याची परवानगी दिली. पंचायत समितीच्या वतीने चालविला जाणारा हा राज्यातील एकमेव पेट्रोलपंप आहे.
एटापल्ली तालुक्याचा विस्तार १०० किमीचा आहे. यातील ९० टक्के गावे नक्षलग्रस्त व दुर्गम भागात आहेत. एटापल्लीवगळता तालुक्यात एकही पेट्रोलपंप नाही. एटापल्लीमध्ये सुद्धा पंचायत समितीच्या पेट्रोलपंपाव्यतीरिक्त दुसरे पेट्रोलपंप नाही. त्यामुळे तालुकाभरातील व भामरागड तालुक्याच्या सीमावर्ती भागातील नागरिक याच पेट्रोलपंपावर पेट्रोल भरत होते.
२००५ ते २०१८ पर्यंत पेट्रोलपंप नियमित सुरू होता. पेट्रोलपंपाची मालकी पंचायत समितीकडे असल्याने या ठिकाणी पंचायत समितीचा लिपीक नेमल्या जातो. ६ एप्रिल रोजी पंचायत समितीचा लिपीक साळुंकी यांचा ग्राहकांसोबत वाद झाला. या वादातून पंचायत समितीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पेट्रोल व डिझेल पंप बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. सदर पेट्रोेलपंप पंचायत समितीचा आहे. मात्र येथील अधिकारी व कर्मचारी हा पेट्रोलपंप स्वत:च्या मालकीचा असल्याच्या अविर्भावात वागतात. पेट्रोलपंपावरील कर्मचाऱ्यांच्या मनमानीमुळे वाहनधारकही कमालीचे त्रस्त झाले आहेत. मात्र या पेट्रोलपंपाशिवाय दुसरा पर्याय नसल्याने कर्मचाºयांची मनमानी खपवत पेट्रोल व डिझेल भरावे लागत आहे.
पेट्रोलपंपाला बाहेरूनच कुलूप ठोकून दरवाजाच्या बाजूला पेट्रोलपंप बंद आहे, असा फलक लावण्यात आला आहे. याबाबत लिपीक साळुंकी यांना विचारणा केली असता उडवाउडवीचे उत्तर दिले. तर संवर्ग विकास अधिकारी अनिल वाघमारे यांनी माझी प्रकृती बरी नाही, मी आल्यानंतर सुरू करू, असे सांगून वेळ मारून नेली.
एटापल्ली येथील पेट्रोलपंप बंद असल्याने वाहनधारकांना आलापल्ली, अहेरी, भामरागड येथून पेट्रोल व डिझेल भरून आणावे लागत आहे. या तिन्ही गावांचे अंतर एटापल्लीपासून ५० किमीपेक्षा अधिक आहे. त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. पेट्रोलपंप सुरू करावा, अशी मागणी तालुक्यातील वाहनधारकांकडून होत आहे.

Web Title: Employee's arbitrarily petrol pump shut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.