आठ वर्षात घटले १७७ चौरस किलोमीटरचे जंगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2020 06:00 AM2020-03-21T06:00:00+5:302020-03-21T06:00:36+5:30

गडचिरोली जिल्ह्याचा एकूण विस्तार १४ हजार ४१२ चौ.किमी आहे. २०११ च्या इंडिया स्टेट रिपोर्टमध्ये गडचिरोली जिल्ह्यात एकूण जंगलाचे क्षेत्र १० हजार ९४ चौ.किमी दाखविण्यात आले आहे. एकूण भूभागाच्या टक्केवारीमध्ये हे प्रमाण ७०.०४ टक्के एवढे आहे. त्यानंतर दर दोन वर्षांनी प्रकाशित रिपोर्टनुसार जंगलाचे प्रमाण घटत चालले असल्याचे दिसून येत आहे.

In eight years, 177 square kilometers of forest was reduced | आठ वर्षात घटले १७७ चौरस किलोमीटरचे जंगल

आठ वर्षात घटले १७७ चौरस किलोमीटरचे जंगल

Next
ठळक मुद्देगडचिरोली जिल्ह्यातील स्थिती : इंडिया स्टेट आॅफ फॉरेस्टचा अहवाल, पर्यावरणासाठी धोक्याची घंटा

दिगांबर जवादे।
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : राज्यात सर्वाधिक जंगलाचा भूभाग असणारा जिल्हा म्हणून गडचिरोली जिल्ह्याची ओळख आहे. मात्र ही ओळख काही वर्षानंतर पुसल्या जाणार की काय, अशी स्थिती निर्माण होत आहे. गडचिरोली जिल्ह्यातील जंगल मागील आठ वर्षांत सुमारे १७७.०६ चौरस किलोमीटरने घटले असल्याची बाब समोर आली आहे. दरवर्षी जंगलाचे क्षेत्र घटत असल्याने ही वनविभागासाठी आणि पर्यावरणासाठी धोक्याची घंटा समजली जात आहे.
भारतीय वन सर्वेक्षण विभागामार्फत दर दोन वर्षांनी इंडिया स्टेट आॅफ फॉरेस्ट रिपोर्ट प्रकाशित केला जातो. २०१९ चा रिपोर्ट नुकताच प्रकाशित झाला आहे. त्यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील घटत्या वनक्षेत्राचे चित्र स्पष्ट करण्यात आले आहे. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी जंगलाचे महत्त्व असल्याने शासन जंगल संरक्षणावर कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे. तरीही मागील काही वर्षात विविध कारणांसाठी मोठ्या प्रमाणात जंगलतोड होत असल्याने जंगलाचे प्रमाण कमी होत असल्याचे दिसून येते.
गडचिरोली जिल्ह्याचा एकूण विस्तार १४ हजार ४१२ चौ.किमी आहे. २०११ च्या इंडिया स्टेट रिपोर्टमध्ये गडचिरोली जिल्ह्यात एकूण जंगलाचे क्षेत्र १० हजार ९४ चौ.किमी दाखविण्यात आले आहे. एकूण भूभागाच्या टक्केवारीमध्ये हे प्रमाण ७०.०४ टक्के एवढे आहे. त्यानंतर दर दोन वर्षांनी प्रकाशित रिपोर्टनुसार जंगलाचे प्रमाण घटत चालले असल्याचे दिसून येत आहे.
२०१९ च्या रिपोर्टमध्ये गडचिरोली जिल्ह्यातील जंगलाचे क्षेत्र ९९१६.९४ चौ.किमी असल्याचे दाखविण्यात आले आहे. त्यानुसार एकूण भूभागावरील जंगलाचे प्रमाण २०११ च्या तुलनेत १.२३ टक्क्यांनी घटून ६८.८१ टक्के झाले आहे. २०११ ते २०१९ या आठ वर्षांच्या कालावधीत सुमारे १७७ चौरस किलोमीटर जंगल कमी झाले आहे. राज्याबरोबरच गडचिरोली जिल्ह्यातीलही जंगल कमी होणे ही भविष्यातील धोक्याची घंटा आहे.

दोन वर्षांत ८७ चौरस किमी जंगल झाले कमी
इंडिया स्टेट आॅफ फॉरेस्ट रिपोर्टनुसार २०१७ मध्ये गडचिरोली जिल्ह्यात एकूण १० हजार ४ चौरस किमी जंगल होते. २०१९ मध्ये ९ हजार ९१६ चौरस किमी जंगल शिल्लक आहे. मागील दोन वर्षांत ८७ किमी जंगल कमी झाले आहे. यावरून जंगलाची तोड मागील दोन वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात झाली असल्याचे दिसून येत आहे. जंगल तोडीचे हे प्रमाण कायम राहिल्यास भविष्यात जंगलच शिल्लक न राहण्याचा धोका नाकारता येत नाही.
८० ते १०० वर्ष वय झालेली जवळपास ५ हजार हेक्टरवरील झाडे दरवर्षी तोडली जातात. या ठिकाणी नवी रोपांची लागवड केली जाते. राज्य शासनाच्या वृक्ष लागवड योजनेंतर्गत २०१६ ते २०१९ या चार वर्षांच्या कालावधीत १५ हजार हेक्टरवर वृक्ष लागवड झाली आहे. नवीन रोपे लहान असल्याने ती सॅटेलाईच्या नजरेत येत नाही, अशी माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. ही झाडे वाढल्यानंतर क्षेत्र वाढल्याचे दिसेल, असे त्यांना वाटते.

Web Title: In eight years, 177 square kilometers of forest was reduced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.