लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : दिवसागणिक वाहनधारकांची संख्या वाढत आहे. पेट्रोलने शंभरी गाठली असली तरी पेट्रोल- डिझेलवर चालणाऱ्या वाहनांचा वेग मंदावलेला नाही. गेल्यावर्षी जानेवारी ते डिसेंबर यादरम्यान जिल्ह्यात २३१ अपघात झाले. त्यात १३१ पुरुष आणि ११ महिलांना जीव गमवावा लागला. याशिवाय ५७ पुरुष आणि १४ स्त्रिया जखमी झाल्या. अपघातांसाठी वाहतुकीचे नियम न पाळणे, हे मुख्य कारण आहे. यासोबतच रस्त्यांची दुरवस्था हेसुद्धा अपघातासाठी एक कारण ठरते. खड्डेमय रस्त्यातून वेगाने गाडी चालवणे, ओव्हरटेक करताना योग्य ती खबरदारी न घेणे, वळण मार्गावर वेग कमी न करणे आणि अनेक वेळा नियमात गाडी चालवत असतानाही समोरच्या व्यक्तीने केलेल्या चुकीमुळे अपघात होऊन अनेकांना हकनाक बळी जावे लागते.जिल्हा वाहतूक सुरक्षा समितीच्या रेकॉर्डनुसार जिल्ह्यात सध्या दोनच ‘ब्लॅक स्पॉट’ (अपघातप्रवण स्थळ) आहेत. त्यापैकी एक सिरोंचा तालुक्यातील आसरअल्ली मार्गावर असलेले आरडा आणि दुसरा कुरखेडा तालुक्यातील पुराडा येथे आहे. याठिकाणी अनेक अपघात होऊन बऱ्याच जणांचा जीव गेला आहे. याशिवाय अपघातप्रवण ठिकाणे आहेत. जिल्हा वाहतूक सुरक्षा समितीने नव्याने आढावा घेऊन इतरही ब्लॅक स्पॉट निश्चित करणे गरजेचे झाले आहे.
दुचाकीतील बळींची संख्या जास्तवर्षभरातील अपघातांमध्ये दुचाकी अपघातांचे प्रमाण सर्वाधिक आहे. याच अपघातातील मृत्यूंचेही प्रमाण जास्त आहे. कारण अपघातग्रस्त दुचाकीस्वारांनी डोक्यावर हेल्मेट घातलेले नव्हते. त्यामुळे मेंदूला मार लागून त्यांचा मृत्यू झाला. असे असतानाही हेल्मेटचा वापर करणाऱ्या दुचाकीस्वारांची संख्या अजूनही नगण्य आहे.
ब्लॅक स्पॉटवर अनेक बळीजिल्ह्यातील २ ब्लॅक स्पॉटसह इतरही ठिकाणी अपघाताचे प्रमाण वाढले आहे. विशेष म्हणजे २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये अपघाताचे प्रमाण कमी झाले आहेत. याशिवाय मृतांची संख्याही कमी झाली आहे. कोरोनाकाळातील लॉकडाऊनचा हा परिणाम आहे. २०१९ मध्ये जिल्ह्यातील अपघातांमध्ये १५७ जणांचा मृत्यू झाला, तर २०२० मध्ये १४२ जणांनी जीव गमावला आहे. रस्ते दुरुस्तीसोबत वाहतूक नियमांबाबत वाहनधारकांमध्ये शिस्त आल्यास जिल्ह्यातील अनेक संभाव्य अपघात टाळता येऊ शकतात.