लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : सोमवारी रात्री धानोरा तालुक्यात दमदार पाऊस झाला. त्यामुळे नदीच्या पाण्याची पातळी वाढून नदीमध्ये वाळू टाकलेला तेंदूपुडा वाहून गेला. त्याचबरोबर नदीपात्रात मुक्काम असलेल्या तेंदूपत्ता मजुरांना रात्र पावसातच काढावी लागली. त्यामुळे त्रस्त होऊन दुसऱ्या दिवशी मंगळवारी तेंदूपत्ता मजूर आपल्या गावाकडे परतले. याचा मोठा फटका तेंदूपत्ता व्यवसायाला बसला आहे.रेतीमध्ये तेंदूपत्ता लवकर वाळत असल्याने तेंदूपत्त्याची फळी नदी पात्रातच लावली जाते. धानोरा तालुका स्थळापासून चार किमी अंतरावर असलेल्या तुकूम व लेखा येथील फळी बोरीया नदीत लावण्यात आली होती. रात्री झालेल्या पावसामुळे नदीच्या पाण्याची पातळी वाढून तेंदूपुडा नदीच्या पाण्यासोबत वाहून गेला. याचा मोठा फटका तेंदूपत्ता व्यवसायाला बसला. तालुका मुख्यालयापासून ११ किमी अंतरावर असलेल्या इरपुंडी येथे गडचिरोली तालुक्यातील मरेगाव येथील मजूर तेंदूपत्ता संकलनासाठी आले होते. सोमवारी पहिल्याच दिवशी त्यांनी तेंदूपत्ता संकलन केले. त्यानंतर सोमवारी रात्री मेघगर्जनेसह पाऊस झाला. मागील आठ दिवसांपासून अधूनमधून वादळ व पाऊस पडत आहे. असेच वातावरण पुढेही राहण्याची शक्यता असल्याने मजुरांनी परत जाण्याचा निर्णय घेतला. जोपर्यंत बोधभराई होत नाही व ग्रामसभा वाहतुकीचा परवाना देत नाही. तोपर्यंत तेंदूपुड्याची जबाबदारी ग्रामसभेची आहे. त्यामुळे नदी पात्रात वाहून गेलेल्या तेंदूपुड्याचे पैसे कंत्राटदार देणार नाही, अशी माहिती एका कंत्राटदाराने दिली.
अवकाळी पावसाचा तेंदूपत्ता संकलनाला फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 00:47 IST
सोमवारी रात्री धानोरा तालुक्यात दमदार पाऊस झाला. त्यामुळे नदीच्या पाण्याची पातळी वाढून नदीमध्ये वाळू टाकलेला तेंदूपुडा वाहून गेला. त्याचबरोबर नदीपात्रात मुक्काम असलेल्या तेंदूपत्ता मजुरांना रात्र पावसातच काढावी लागली.
अवकाळी पावसाचा तेंदूपत्ता संकलनाला फटका
ठळक मुद्देअनेक मजूर स्वगावी परतले : नदी पात्रातील तेंदूपुडा गेला वाहून