रामचंद्र कुमरी झिंगानूरपाच-सहा दिवसांपूर्वी ६ व ७ सप्टेंबर रोजी झालेल्या संततधार पावसामुळे सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर परिसरातील अनेक नाल्यांवरील पूल तुटून पुराच्या पाण्याने वाहून गेले आहेत. या परिसरातील अनेक रस्ते उखडले आहेत. संततधार पावसामुळे झिंगानूर परिसरात मोठ्या प्रमाणात वाताहत झाली असून या परिसरातील १२ गावांचा सिरोंचा तालुका मुख्यालयाशी संपर्क रस्त्याअभावी अद्यापही तुटलेलाच आहे.झिंगानूर ते रोमनपल्ली दरम्यानच्या नाल्यावर लहान-लहान पाईप टाकून पुलाचे बांधकाम करण्यात आले. मात्र सदर पाईपमध्ये कचरा अडकल्याने पावसाचे पाणी पाईपमधून न जाता पुलाच्यावरून जात होते. या पुलावरून जवळपास ७ ते ८ फूट पाणी वाहत असल्याने या मार्गावरील पुलाची पूर्णत: दूरावस्था झाली. या परिसरातील ताडहोऱ्या नाल्याची उजव्या बाजुची भिंत पावसामुळे कोसळली आहे. तसेच सदर रस्ताही पूर्णत: वाहून गेला आहे. पावसामुळे कोरेतोबू नाल्यावरील पुलाच्या पाईपमध्ये कचरा जमा झाला. यामुळे या पुलावरूनही मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते. यामुळे या पुलाची दूरावस्था झाली आहे. या परिसरातील येलचील-वडदेली-मंगीगुडम-रोमपल्ली रस्ता काही दिवसापूर्वीच श्रमदानातून तयार करण्यात आला होता. नंतर या मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत डांबरीकरण करण्यात आले. मात्र पाच-सहा दिवसांपूर्वी आलेल्या पावसामुळे सदर मार्गावरील डांबरीकरण पूर्णत: उखडले आहे. संततधार पावसामुळे झिंगानूर परिसरातील अनेक नाल्यांवरील पुलांची दूरावस्था झाली आहे. तसेच अनेक डांबरीकरण व कच्चे मार्ग पूर्णत: उखडले आहे. या परिसरातील १२ गावांसाठी असलेली बसफेरी ६ सप्टेंबरपासून राज्य परिवहन ंमहामंडळाच्या अहेरी आगाराने बंद केली आहे. ताडहोऱ्या, कारेतागू व मामेडीतोगू या नाल्यावर नवीन पुलाचे बांधकाम करावे, अशी मागणी झिंगानूर पसिरातील १२ गावांतील नागरिकांनी केली आहे.