धानपिकाच्या रोवणीअभावी शेतजमिनी झाल्या कोरड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2020 05:00 AM2020-07-31T05:00:00+5:302020-07-31T05:01:04+5:30

गाढवी नदीच्या पलीकडील शंकरपूर, डोंगरमेंढा, कसारी, पिंपळगाव, विठ्ठलगाव, पोटगाव, विहिरगाव या परिसरातील शेकडो हेक्टर शेतजमीन पावसाअभावी अजूनही रोवणीच्या प्रतीक्षेत आहे. धान पऱ्ह्यांना ५० दिवस होऊनही रोवणी सुरू न झाल्यामुळे शेतकरीवर्ग हताश झाला आहे. रोवणी न झाल्यास कोरडा दुष्काळ पडण्याची गडद सावली पसरली आहे. शेतातील बांध्यांमध्ये गवतच गवत वाढले आहे.

Due to lack of planting of paddy, the farm lands became dry | धानपिकाच्या रोवणीअभावी शेतजमिनी झाल्या कोरड्या

धानपिकाच्या रोवणीअभावी शेतजमिनी झाल्या कोरड्या

Next
ठळक मुद्देपावसाच्या दडीमुळे बिकट परिस्थिती : दीड महिन्यापेक्षा जास्त कालावधी लोटल्याने पºहे जाणार वाया

लोकमत न्यूज नेटवर्क
विसोरा : धानपीकाच्या रोवणीसाठी योग्य प्रमाणात पाऊसच पडत नसल्यामुळे कोरड्या पडलेल्या शेतातील धानाचे वाफे करपने सुरू झाले आहे. काही शेतातील धानाचे पऱ्हे पेरणीपासून दीड महिना उलटल्याने गुडघाभर वाढले आहेत. आता रोवणीचा कालावधी निघून जात असल्याने विसोरा परिसरासह अनेक भागात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.
गाढवी नदीच्या पलीकडील शंकरपूर, डोंगरमेंढा, कसारी, पिंपळगाव, विठ्ठलगाव, पोटगाव, विहिरगाव या परिसरातील शेकडो हेक्टर शेतजमीन पावसाअभावी अजूनही रोवणीच्या प्रतीक्षेत आहे. धान पऱ्ह्यांना ५० दिवस होऊनही रोवणी सुरू न झाल्यामुळे शेतकरीवर्ग हताश झाला आहे. रोवणी न झाल्यास कोरडा दुष्काळ पडण्याची गडद सावली पसरली आहे. शेतातील बांध्यांमध्ये गवतच गवत वाढले आहे. आता पाऊस आल्यावर रोवणीची कामे केली तरी उत्पन्नात मोठी घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.मागील १९ जुलैला पावसाचे तीन नक्षत्र संपून पुष्य हे चौथे नक्षत्र सुरू झाले. मात्र याही नक्षत्राने शेतकऱ्यांची घोर निराशा केली. पुष्य नक्षत्रात तीन-चार दिवस हलक्या-मध्यम पावसाच्या मोजक्याच सरी कोसळल्या. या पाण्याने करपलेल्या वा करपत चाललेल्या वाफ्यांना नवजीवन मिळाले. परंतु वरटेकरी, वरपावसाच्या शेतातील धान पीक रोवणीची कामे अजूनही सुरू होऊ शकलेली नाहीत.
यंदा पावसाला जोर नसल्याने जमिनीवर पडलेले पाणी, पाऊस बंद होताच उष्णतेच्या तीव्रतेने जिरून जात आहे. पाऊस पडून रोवणीसाठी चिखलणी सुरू होईल असे पाणी बांध्यांमध्ये साचत नसल्याने रोवणीयोग्य वाफ्यांना ५० दिवसांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. जमीन मुरमाड व उंच भागावर असेल अशा शेतातील वाफे करपले, तर ज्या जमिनीत ओलावा टिकून आहे त्या शेतातील धान वाफे गुडघाभर वाढले. कसारी, डोंगरमेंढा, विठ्ठलगाव, पोटगाव, विहिरगाव या गावशिवारातील शेकडो हेक्टर शेतजमिनी रोवणीशिवाय रिकाम्या आहेत.

रोवणी पूर्ण करण्यासाठी प्रचंड धावपळ
काही शेतकरी रोवणी करण्यासाठी शेतातील किंवा शेताजवळच्या जलसाठयातून मोटारपंप, होंडा पंप पाईपद्वारे दूरवरून शेतात पाणी आणण्याचा प्रयत्न करत आहेत. दिवस-रात्र मेहनत करून रोवणी पूर्ण झाली पाहिजे यासाठी मेहनत घेत आहेत. दुसरीकडे रोवणी झालेल्या पिकांनाही आता पाऊस गायब होऊन उष्णता वाढत असल्याने पाणी द्यावे लागत आहे. त्यामुळे एकाच वेळेस विजेचा वापर वाढत आहे. याचा परिणाम घरगुती वापराच्या विजेवर होत आहे. दिवसातून २०-२५ वेळा वीजप्रवाह बंद-चालू होतो. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांनाही बसत आहे.

देसाईगंज तालुक्यात ३५ टक्के पीक धोक्यात
देसाईगंज तालुक्यात सोमवारपर्यंत ४२ टक्के पाऊस पडला आहे. देसाईगंज महसूल मंडळात ६३ टक्के तर शंकरपूर महसूल मंडळात ६५.९५ टक्के रोवणीची कामे पूर्ण झाली आहेत. देसाईगंज तालुक्यात एकूण ६५.१३ टक्के रोवणी आटोपली असल्याची माहिती कृषी विभागाने दिली. यामुळे उर्वरित ३५ टक्के क्षेत्रावरील पीक यंदा धोक्यात आले. पाऊस लांबल्यास रोवणी झालेल्या क्षेत्रावरीलही पीक धोक्यात येऊ शकते. देसाईगंज प्रमाणेच जिल्ह्याच्या अनेक कमीअधिक प्रमाणात हिच स्थिती पहायला मिळत आहे.

Web Title: Due to lack of planting of paddy, the farm lands became dry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती