लोकमत न्यूज नेटवर्क चामोर्शी : येथील जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोरील शेतशिवार परिसरात याच विभागात शिपाई पदावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. बाळकृष्ण डोनूजी किरमे (५५) रा.तेलंग मोहल्ला चामोर्शी असे मृतक कर्मचाऱ्याचे नाव आहे. रामकृष्ण किरमे हे नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी ५.३० वाजताच्या सुमारास फिरावयास गेले. सकाळी ११ वाजतानंतरही ते घरी परतले नाही. त्यामुळे त्यांच्या पत्नीने कार्यालयात जाऊन खात्री केली, असता ते कार्यालयात आले नसल्याचे दिसून आले. त्यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नव्हता. त्यानंतर त्यांचा सर्वत्र शोध सुरू झाला. मंगळवारी ते आढळून आले नाही. त्यानंतर बुधवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास त्यांचा मृतदेह आष्टी मार्गावर फिरावयास गेलेल्या नागरिकांना आढळून आला. ही माहिती चामोर्शी पोलिसांना मिळाली. ओळख पटल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या कुटुंबीयांना माहिती दिली. मृतक कर्मचाऱ्याची पत्नी मायाबाई किरमे (४५) यांनी चामोर्शी पोलीस ठाण्यात या घटनेची फिर्याद दिली. मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या सुपूर्द करण्यात आले. मृतकाच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक किरण अवचर यांच्या मार्गदर्शनात सहायक फौजदार हरिशचंद्र कन्नाके करीत आहेत. या घटनेसंदर्भात चामोर्शी पोलीस ठाण्यात मर्ग दाखल करण्यात आला आहे.
जि. प. कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळला
By admin | Updated: May 11, 2017 01:41 IST