देसाईगंज : देसाईगंज औद्योगिकदृष्ट्या जिल्ह्यातील महत्वपूर्ण शहर म्हणून ओळखले जाते. मात्र मागील काही दिवसांपासून देसाईगंज शहरात अनेक रोगांच्या साथींनी नागरिकांना पछाडले असून शहरातील ५ पोलीस व १ सीआपीएफ जवानासह जवळपास अनेक लोकांना विविध आजार जडले आहेत. त्यामुळे नागरिक उपचारासाठी रूग्णालयात गर्दी करीत आहेत. देसाईगंजातील लोकसंख्या ४० हजारच्या आसपास आहे. त्यादृष्टीने देसाईगंजचे भौगोलिक क्षेत्रही मोठे आहे. परंतु स्थानिक प्रशासनाच्यावतीने शहरातील अंतर्गत सुव्यवस्था राखली जात नसल्याने शहरात रोगांनी आपला जम बसविला आहे. त्यामुळे स्थानिक पोलीस ठाण्यातील पोलीस जवान फैय्याज सैयद, संतोष हंडरा, किसन सिडाम, रवी पुराम, महिंद्र पदा यांना हिवतापाची तर सीआरपीएफचे जवान अभिजित खुफसे यांना काविळची लागण झाली असल्याने त्यांना उपचारार्थ ग्रामिण रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. त्याबरोबरच न्युमोनिया, मलेरिया, फायलेरिया, डेंग्यू, टायफाईड, पोटदुखी, सर्दी, ताप आदी रोगांनी पछाडलेले रुग्णही भरती आहेत. शासकीय व खासगी रूग्णालय रूग्णांच्या गर्दीने भरले असून या दिवसामध्ये डॉक्टरांची चलती आहे. ज्या सेवा शासकीय रूग्णालयांमध्ये मिळायला पाहिजे होत्या. त्या सेवा स्थानिक शासकीय रूग्णालयात मिळत नसल्याने रूग्णांना खासगी डॉक्टरांचा आधार घ्यावा लागत आहे. शासकीय रूग्णालयात रूग्णांची तपासणी करण्यासाठी महिला व पुरूष डॉक्टरांचा अभाव असल्याने अनेक रूग्ण परत जात आहेत. दिवसाला ४०० ते ५०० रूग्ण रूग्णालयात उपचारासाठी दाखल होत आहे. मात्र केवळ दोनच डॉक्टर रूग्णांच्या सेवेत असल्याने रूग्णांची गैरसोय होत आहे. दोन कोटी रूपये खर्च करून ग्रामीण रूग्णालयाचे बांधकाम करण्यात आले. परंतु या रूग्णालयात वैद्यकीय अधिकारी तंत्रज्ञ व तज्ज्ञांची कमतरता असल्याने रूग्णांना वेळेवर योग्य औषधोपचार मिळण्यास अडचण निर्माण होत आहे. शहरातील अनेक वस्त्यांमध्ये घाण पसरली आहे. मात्र या वस्तीत उपाययोजना करण्यास स्थानिक प्रशासनाचे पूर्णत: दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे प्रशासनाने लक्ष घालून देसाईगंजातील रोगराईवर आळा घालण्यासाठी प्रयत्न करावा, अशी मागणी शहरातील नागरिकांनी केली आहे.
देसाईगंजात रोगांचे थैमान
By admin | Updated: August 31, 2014 23:48 IST