तुला व्हिडीओ काढता येतो, मला पण शिकवं! पोलिस महासंचालकांची आदिवासी मुलीला दाद 

By संजय तिपाले | Published: February 17, 2024 06:48 PM2024-02-17T18:48:09+5:302024-02-17T18:48:33+5:30

महासंचालक शुक्ला यांच्या साधेपणाने उपस्थित आदिवासी बांधव देखील भारावून गेले.

Director General of Police praises the tribal girl | तुला व्हिडीओ काढता येतो, मला पण शिकवं! पोलिस महासंचालकांची आदिवासी मुलीला दाद 

तुला व्हिडीओ काढता येतो, मला पण शिकवं! पोलिस महासंचालकांची आदिवासी मुलीला दाद 

गडचिरोली: 'अरे व्वा... तुला व्हिडिओ काढता येतो... मला पण शिकवं...' अशा शब्दांत राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी आदिवासी चिमुकलीला दाद दिली. यावेळी तिच्या जवळ जाऊन हितगुज साधण्याचा मोह त्यांना आवरता आला नाही. महासंचालक शुक्ला यांच्या साधेपणाने उपस्थित आदिवासी बांधव देखील भारावून गेले. अतिदुर्गम गर्देवाडा (ता.एटापल्ली) या नक्षल्यांच्या बालेकिल्ल्यातील पोलिस मदत केंद्राला पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी १७ फेब्रुवारीला भेट दिली. हेलिकॉप्टरमधून एंट्री झाल्यानंतर जनजागरण मेळाव्यात पोहोचताच रश्मी शुक्ला यांनी उपस्थितांना ' कसे आहात तुम्ही सगळे...?' असा प्रश्न केला. त्यावर आदिवासी बांधव व चिमुकले काहीच बोलले नाहीत, पण याचवेळी समोरच्या रांगेत बसलेल्या व मोबाइलमध्ये व्हिडिओ घेत असलेल्या मुलीने रश्मी शुक्ला यांचे लक्ष वेधले.

मंचावर न जाता शुक्ला या तिच्याजवळ गेल्या व तुला व्हिडिओ घेता येतो, मला येत नाही, शिकवते का... असे म्हणून दाद दिली. तिच्याशी त्यांनी संवाद साधला व तिला दाद दिली. आपल्या भाषणात त्यांनी शिक्षण हाच प्रगतीचा मार्ग असून आदिवासी समुहातून राष्ट्रपतीपदापर्यंत पोहोचता येते, त्यामुळे ध्येय ठरवले तर यश नक्कीच मिळते, असे सांगितले. गर्देवाडासारख्या भागात पोलिसांना पोहोचता येत नव्हते, आता मदत केंद्र झाले आहे. यातून परिसरातील नागरिकांना आवश्यक त्या सर्व सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली. ‘दादालोरा खिडकी’ सारख्या उपक्रमातून दुर्गम भागातील आदिवासी नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळत आहे. शासन तुमच्यापर्यंत पोहोचले आहे, तेव्हा सुविधांचा लाभ घ्या , असे आवाहन त्यांनी केले.   नागरिकांची मने जिंकून त्यांच्याच सहकार्यानेच 

नक्षलवादाचा बीमोड करु, असे आश्वासन त्यांनी दिले. राज्य गुप्तवार्ता विभागाचे आयुक्त शिरीष जैन, नक्षलविरोधी अभियानचे विशेष पोलिस महानिरीक्षक  संदीप पाटील, पोलिस उपमहानिरीक्षक  अंकित गोयल, पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अहेरीचे अपर    अधीक्षक  एम. रमेश, उपअधीक्षक योगेश रांजनकर यांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते आदिवासींना कपडे, भांडी, मुलांना क्रीडा व शैक्षणिक साहित्यांचे वाटप केले.सूत्रसंचालन गर्देवाडा पोलिस मदत केंद्राचे सहायक निरीक्षक बाळासाहेब जाधव यांनी केले तर आभार अपर अधीक्षक एम. रमेश यांनी मानले.
 
सहा लाख नागरिकांना योजनांचा लाभ
प्रास्ताविक पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी केले. ते म्हणाले, पोलिस अतिदुर्गम व दुर्गम भागात देखील नागरिकांच्या सुरक्षेसाठी २४ तास प्रयत्नरत आहेत. पोलिसांच्या दादालोरा खिडकीतून विविध उपक्रम व योजना राबविल्या जात आहेत. यातून आतापर्यंत पाच लाख ९६ हजार नागरिकांना लाभ दिल्याची माहिती त्यांनी दिली. 

Web Title: Director General of Police praises the tribal girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.