रवी रामगुंडेवार।लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : तेंदूपत्त्याच्या फडीवर तेंदूपत्ता विक्रीसाठी गेलेल्या एटापल्ली येथील दुर्योधन कुंकलवार यांना दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास अचानक चक्कर येऊन ते जमिनीवर कोसळले. कोरोनाच्या भीतीमुळे फडीवर उपस्थित एकाही व्यक्तीने मदत केली नाही. जवळपास दीड तास दुर्योधन हे फडीवरच पडून होते. ५ वाजताच्या सुमारास एटापल्ली येथील प्रभाकर पुकटलवार यांनी दुर्योधन यांना एटापल्ली ग्रामीण रूग्णालयात भरती केली. या दीड तासाच्या कालावधीत दुर्योधन यांच्यावर उपचार झाले असते तर त्यांचे प्राण वाचले असते. कोरोनामुळे एटापल्लीवासीयांमधील संवेदनशीलता संपत चालली काय? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.मागील तीन महिन्यांपासून संपूर्ण देशात कोरोनाने हाहाकार माजविला आहे. प्रत्येक नागरिक कोरोनापासून स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न करीत आहे. कोरोनाची लागण होऊ नये, यासाठी शारीरिक अंतर पाळण्याचे आवाहन शासनामार्फत केले जात आहे. काही प्रमाणात नागरिक त्याचे पालनसुद्धा करीत आहेत. शारीरिक अंतर पाळत असतानाच भावनिक अंतर कमी होणार नाही, याची खबरदारीसुद्धा घेणे आवश्यक आहे. मात्र शारीरिक अंतराबरोबच भावनिक अंतरही कमी झाल्याचे एटापल्ली येथे घडलेल्या घटनेवरून दिसून येत आहे.मागील दोन दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्याचे तापमान ४४ अंशाच्या वर पोहोचले आहे. प्रचंड उष्णतामानामुळे घराबाहेर पडणे कठिण झाले आहे. अशाही परिस्थितीत दुर्योधन यांनी एटापल्लीपासून सहा किमी अंतरावरील एकरा गावात शनिवारी दुपारी ३.३० वाजता तेंदूपुडे विकण्यासाठी नेले. हृदयविकाराचा झटका किंवा उष्माघातामुळे दुर्योधन यांना चक्कर आली ते जमिनीवर कोसळले. चक्कर आलेल्या व्यक्तीला सर्वप्रथम पाणी पाजले जाते. मात्र कोरोनाच्या भीतीमुळे फडीवर उपस्थित असलेल्या शेकडो नागरिकांपैकी एकाही नागरिकाने दुर्योधन यांना पाणी पाजले नाही. ते बेशुद्धावस्थेत तेथेच पडून होते. सायंकाळी ५ वाजता ही बाब एटापल्ली येथील प्रभाकर पुकटलावार यांना माहीत झाली. त्यांनी रूग्णवाहिकेसाठी फोन केला. रूग्णवाहिका उपलब्ध नसल्याने एटापल्लीवरून कंत्राटदाराचे वाहन बोलावून दुर्योधन यांना एटापल्ली ग्रामीण रूग्णालयात भरती केले. प्रकृती अतिशय चिंताजनक असल्याने दुर्योधन यांना अहेरी रूग्णालयात हलविण्याचा सल्ला देण्यात आला. अहेरी येथे नेत असतानाच दुर्योधन यांनी शेवटचा श्वास घेतला.चक्कर येऊन पडले त्यावेळीच दुर्योधन यांना रूग्णालयात दाखल केले असते तर कदाचित त्यांचे प्राण वाचले असते. मात्र कोरोना संसर्गाच्या भीतीने हादरलेल्या माणसातील माणुसकी ही संपत आहे काय? असे होत असेल तर भविष्यात मानवी समाजासाठी धोक्याची घंटा ठरू शकते. दुर्योधन यांच्या पश्चात पत्नी, चार मुली आहेत. त्यापैकी दोन मुलींचे लग्न झाले आहेत. दुर्योधन हे मिस्त्री काम करून जीवन जगत होते. दुर्योधन यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबाचे छत्र हरपले आहे. त्यामुळे कुटुंबाला मदत करावी, अशी मागणी आहे.मजुरांचा विमा काढणे आवश्यकतेंदूपत्ता तोडण्यासाठी आलेल्या प्रत्येक मजुराचा विमा काढणे कंत्राटदाराला बंधनकारक आहे. विमा काढल्यास अशा आकस्मिक स्थितीत मजुराच्या कुटुंबाला मदत देणे शक्य आहे. यापूर्वी वन विभागाकडून कंत्राट घेतेवेळी वन विभाग संबंधित कंत्राटदाराला मजुरांचा विमा काढण्याची सक्ती करीत होते. याचा लाभ मजुरांना होत होता. ग्रामसभा यासुद्धा लिलावाने कंत्राटदाराला तेंदूपत्ता विकतात. त्यामुळे मजुरांचा विमा काढणे ही कंत्राटदाराची जबाबदारी आहे. दुर्योधन यांच्या कुटुंबीयांना कंत्राटदाराने मदत द्यावी, अशी मागणी केली जात आहे.
कोरोनामुळे एटापल्लीवासीयांची संवेदनशीलता संपली काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 05:01 IST
मागील दोन दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्याचे तापमान ४४ अंशाच्या वर पोहोचले आहे. प्रचंड उष्णतामानामुळे घराबाहेर पडणे कठिण झाले आहे. अशाही परिस्थितीत दुर्योधन यांनी एटापल्लीपासून सहा किमी अंतरावरील एकरा गावात शनिवारी दुपारी ३.३० वाजता तेंदूपुडे विकण्यासाठी नेले. हृदयविकाराचा झटका किंवा उष्माघातामुळे दुर्योधन यांना चक्कर आली ते जमिनीवर कोसळले. चक्कर आलेल्या व्यक्तीला सर्वप्रथम पाणी पाजले जाते.
कोरोनामुळे एटापल्लीवासीयांची संवेदनशीलता संपली काय?
ठळक मुद्देदीड तासानंतर कुंकलवार यांना केले भरती : फडीवर उपस्थितांनी मदत केली नाही