अतिक्रमण काढण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:38 AM2021-05-07T04:38:09+5:302021-05-07T04:38:09+5:30

गडचिरोली : कॉम्प्लेक्स परिसरात विविध मार्गांवर अनेक व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. या अतिक्रमणामुळे वाहतुकीस अडथळा येत आहे. त्यामुळे हे ...

Demand for removal of encroachment | अतिक्रमण काढण्याची मागणी

अतिक्रमण काढण्याची मागणी

Next

गडचिरोली : कॉम्प्लेक्स परिसरात विविध मार्गांवर अनेक व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. या अतिक्रमणामुळे वाहतुकीस अडथळा येत आहे. त्यामुळे हे अतिक्रमण हटविण्याची मागणी होत आहे.

अतिक्रमणामुळे सिंचन क्षेत्रात घट

देसाईगंज : तालुक्यातील अनेक मामा तलावांमध्ये सभोवतालच्या शेतकऱ्यांनी अतिक्रमण करून त्यामध्ये धानाच्या बांध्या निर्माण केल्या आहेत. त्यामुळे जलपातळीत घट झाली आहे. सदर अतिक्रमण हटविण्याकडे सिंचन विभागाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे तलावातील सिंचन क्षेत्रही घटत आहे.

लेटलतिफ कर्मचाऱ्यांवर कारवाई करा

धानोरा : कर्मचाऱ्यांनी शासकीय कार्यालयाच्या वेळेवर येणे गरजेचे असतानाही बहुतांश कर्मचारी ११ वाजल्याशिवाय येतच नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी. शासकीय कार्यालयांमध्ये नागरिक येऊन अधिकाऱ्यांची प्रतीक्षा करीत असतात. अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत नागरिकांना टेबलाजवळ उभे राहावे लागते.

वनहक्क प्रकरणे रखडली

एटापल्ली : वनहक्क कायद्यानुसार वनजमिनीवर अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तीला शासनाकडून वनहक्क प्रदान केले जातात. मात्र, गडचिरोली जिल्ह्यात हजारो नागरिकांना अजूनही वनपट्टे प्राप्त झाले नाहीत. त्यामुळे नागरिक कार्यालयांचे उंबरठे झिजवत आहेत. एटापल्ली, अहेरी तालुक्यातील अनेक अतिक्रमणधारकांचे वनहक्क पट्टे प्रलंबित आहेत.

आरोग्य केंद्राच्या इमारती जीर्णावस्थेत

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील मन्नेराजाराम, रेगडी आदी ठिकाणच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारती जीर्णावस्थेत असून, येथील रुग्णवाहिकादेखील आजारी अवस्थेत आहे. अनेक आरोग्य केंद्रांच्या छतांवर ताडपत्र्या टाकून काम चालविले जात आहे.

राजीव गांधी सभागृहाच्या मागे घाणीचे साम्राज्य

गडचिरोली : स्थानिक इंदिरा गांधी चौकातील राजीव गांधी सभागृहाच्या मागील परिसरात मोठ्या प्रमाणात घाण पसरली असून, याकडे नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. या परिसरातील दुकानदार याच ठिकाणी लघुशंकेसाठी जातात व दुकानातील कचराही टाकतात.

अनेक शासकीय इमारतींची दुरवस्था

सिरोंचा : अहेरी उपविभागातील सिरोंचा तालुक्यात शासनाच्या विविध विभागांची अनेक कार्यालये आहेत. मात्र बहुतांश कार्यालयांच्या इमारती जुन्या असून, त्या जीर्ण झाल्या आहेत. पावसाळ्यात येथील कर्मचारी व सभोवतालच्या नागरिकांना धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अनेक ठिकाणचे दिशादर्शक फलक बेपत्ता

एटापल्ली : अहेरी उपविभागातील मार्गावर लावण्यात आलेले अनेक ठिकाणचे दिशादर्शक फलक बेपत्ता झाले आहेत. यामुळे रात्री अनोळखी नागरिक तसेच वाहनचालक रस्ता विसरून भलतीकडेच वळतात. संबंधित यंत्रणेने अशा ठिकाणी दिशादर्शक फलक लावावेत, अशी मागणी होत आहे.

कोरची तालुक्यातील रस्ते दुरुस्त करा

कोरची : तालुक्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील रस्त्यांची मागील अनेक वर्षांपासून डागडुजी करण्यात आली नाही. त्यामुळे रस्त्यावर गवत उगवले आहे. गावकऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

गेवर्धा-शिरपूर मार्गाचे रुंदीकरण करा

कुरखेडा : तालुक्यातील गेवर्धा-अरततोंडी-शिरपूर या मार्गावरील वर्दळ वाढल्याने मार्गाची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या मार्गावरील अपघाताची शक्यता बळावली आहे. रुंदीकरणाची मागणी आहे.

संरक्षण भिंतीअभावी शाळा आवारात जनावरांचा वावर

आलापल्ली : अहेरी पंचायत समितीअंतर्गत दुर्गम गावातील जिल्हा परिषदेच्या अनेक प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांना अद्यापही पक्क्या स्वरूपाची संरक्षण भिंत उभारण्यात आली नाही. तसेच अनेक शाळांना प्रवेशद्वार उभारण्यात आले नाही. परिणामी, गावातील मोकाट जनावरे शाळा परिसरात जाऊन हैदोस घालत आहेत.

बसस्थानक परिसरात खासगी टॅक्सींचे अतिक्रमण

धानोरा : गडचिरोली-धानोरा-मुरूमगाव मार्गावर सध्या चारचाकी व दुचाकी वाहनांची वर्दळ प्रचंड वाढली आहे. धानोराचे बसस्टँड रस्त्यालगतच आहे. स्वतंत्र जागा नसल्याने काळीपिवळी टॅक्सी व इतर खासगी बसेस या ठिकाणी अतिक्रमण करतात तसेच दररोज अनेक प्रवासी बसवून वाहतूक सुरू आहे.

कर्मचाऱ्यांना संगणक प्रशिक्षण द्या

गडचिरोली : ऑनलाइन वेतन देयक तयार करण्यासाठी नेट कनेक्टिव्हिटीसोबतच संगणकाचे संपूर्ण ज्ञान असणे गरजेचे आहे. मात्र अनेक शाळांमधील शिक्षक तसेच लिपिकांना संगणकाचे परिपूर्ण ज्ञान नाही. शाळा कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची गरज आहे.

अनेक नागरिक शिधापत्रिकेपासून वंचित

कुरखेडा : जिल्ह्यातील दुर्गम भागातील नागरिकांना शिधापत्रिका मिळाली नसल्याने अजूनही ते वंचित आहेत. तहसील कार्यालयात परिपूर्ण कागदपत्रांसह अर्ज केल्यानंतरही तालुक्यातील एपीएल नागरिकांना शिधापत्रिका देण्यात आलेली नाही.

धानोरा शहरातील अतिक्रमण काढा

धानोरा : शहरात रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमण वाढले आहे. त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. परिणामी, येथे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. प्रशासनाने सदर अतिक्रमण तत्काळ काढावे, अशी मागणी होत आहे.

एटापल्ली तालुक्यातील मजूर बोनसपासून वंचित

एटापल्ली : गडचिरोली जिल्ह्यातील तेंदुपत्ता मजूर अजूनही तेंदूपत्ता बोनसच्या प्रतीक्षेत आहेत. परिसरातील अनेक नागरिक बोनसपासून वंचित आहेत. अनेक महिन्यांचा कालावधी लोटूनही बोनस मिळाला नसल्याने मजूर बँक व वनविभागाच्या कार्यालयात चकरा मारत आहेत.

खाद्यपदार्थांची रस्त्यावरच विक्री

चामोर्शी : शहरातील अंतर्गत रस्त्यांवर उघड्यावर खुलेआम खाद्यपदार्थांची विक्री केली जात आहे़. हल्ली उघड्यावर खाद्य पदार्थांची सर्रास विक्री होत असल्याने शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे़

सामान्य रुग्णालयातील लिफ्ट सुरू करा

गडचिरोली : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील लिफ्ट मागील अनेक दिवसांपासून बंद आहे. लिफ्टची व्यवस्था केल्यानंतर केवळ दोन ते तीन दिवस लिफ्ट सुरू होती. त्यानंतर लिफ्ट बंद करण्यात आली. लिफ्ट सुरू करण्याची मागणी होत आहे.

खासगी वाहतुकीचा बसला फटका

गडचिरोली : खासगी वाहने बसच्या पाच मिनिटांपूर्वी सोडली जातात. त्यामुळे संपूर्ण प्रवासी खासगी वाहनाने प्रवास करतात. त्यांच्या मागे बस जात असल्याने बसला प्रवासी मिळत नाहीत.

देवलमरी परिसरात सुरळीत वीजपुरवठा करा

अहेरी : तालुक्यात मागील अनेक दिवसांपासून वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. विशेषत: रात्रीच्या सुमारास वीज खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. परंतु सुरळीत वीजपुरवठा करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. देवलमरी-इंदाराम परिसरात इंदाराम, काटेपल्ली, कोलपल्ली, व्यंकटरावपेठा, वट्रा खुर्द, वट्रा बुज, व्यंकटापूर, आवलमरी, संड्रा, मोदूमतुर्रा आदी गावांचा समावेश होतो. या परिसरात मागील अनेक दिवसांपासून रात्रीच्या सुमारास वीजपुरवठा खंडित होत आहे.

बामणीच्या प्रवासी निवाऱ्याची दुरुस्ती करण्याची मागणी

सिरोंचा : तालुक्यातील बामणी येथील प्रवासी निवाऱ्याची दुरवस्था झाली आहे. प्रवाशांना त्रास होत असल्याने प्रवासी निवाऱ्याच्या दुरुस्तीकडे लक्ष द्यावे, अशी मागणी परिसरातील प्रवाशांकडून होत आहे. बामणी येथील प्रवासी निवाऱ्याची दुरवस्था झाली असल्याने प्रवासी निवारा कधीही कोसळू शकतो. त्यामुळे प्रवाशांना उन्ह, वारा, पावसात उभे राहावे लागते. मात्र प्रवासी निवाऱ्याच्या दुरुस्तीकडे संबंधित विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन येथील निवाऱ्याची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: Demand for removal of encroachment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.