लोकमत न्यूज नेटवर्कगुड्डीगुडम (गडचिरोली) : धैर्याच्या कामासाठी 'वाघासारखी हिंमत, वाघासारखे काळीज हवे,' असे सहज बोलले जाते; पण वाघ समोर दिसताच माणूस हिंमत हरतो. त्याला मृत्यू 'याचि देही, याचि डोळा'ची अनुभूती होते. पण, त्याच्या धिटाईने सामना करणारे काहीजण असतात. काळ बनून आलेल्या वाघाशीसुद्धा थेट भिडतात. अशीच हिंमत दाखवत थेट वाघीण व तिच्या दोन बछड्यांशी गुराख्याने दोन हात केले. यात ते गंभीर जखमी झाले, पण हातातील काठीने वाघिणीचा हल्ला परतावून लावला. हा थरार अहेरी तालुक्याच्या खांदला गावाच्या जंगलात बुधवारी (दि. २४) घडला. शिवराम गोसाई बामणकर (६२, रा. खांदला, तालुका अहेरी) असे गंभीर जखमी झालेल्या गुराख्याचे नाव आहे.
शिवराम बामणकर हे नेहमीप्रमाणे गावालगत जंगलात बुधवारी सकाळी ९:३०च्या सुमारास गुरे चराईसाठी घेऊन गेले. हा परिसर कमलापूर वन परिक्षेत्रातील राजाराम उपक्षेत्रातील चिरेपल्ली बिटातील कंपार्टमेंट नंबर १५७ मध्ये समाविष्ट आहे. बैल चरत असतानाच शिवराम हे त्यांच्यावर देखरेख करीत होते. दरम्यान, सकाळी १०:०० च्या सुमारास झुडपात दबा धरून बसलेल्या वाघिणीने शिवराम यांच्यावर झडप घातली. सोबत दोन बछडेसुद्धा होती. शिवराम यांना काहीच सुचले नाही. वाघ पाहून त्यांची भंबेरी उडाली. मात्र, त्यांनी न घाबरता हातातील काठी उचलली व वाघाचा प्रतिकार केला. काठीने वाघाचा हल्ला परतावून लावला. मात्र, तोपर्यंत वाघीण व बछड्यांनी त्यांच्या डोक्यावर व शरीराच्या अन्य अवयवांवर नखांनी ओरखडे केले. वाघीण पिलांसह जंगलात पळून गेली.
वनाधिकारी म्हणतात, वाघ नव्हे; नातेवाइकांचा दावा, हल्ला वाघानेच केला
शिवराम बामणकर यांच्यावर हल्ला करणारा वन्यप्राणी हा वाघ नव्हे, तर इतर हिंस्त्र वन्य प्राण्याने शिवराम यांच्यावर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. मात्र, शिवराम यांचे नातेवाइक वनिता गजानन बामणकर, सुरेश पेंदाम, साधू पेंदाम, साईबाबा बामणकर यांनी वाघानेच हल्ला केल्याचा दावा केला आहे. शासनाने भरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
दोन महिन्यांपूर्वी मुलाचे निधन
शिवराम हे जखमी अवस्थेतच कसेबसे गावात परतले. नातेवाइकांनी त्यांना सुरुवातीला राजाराम प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती केले. त्यानंतर अहेरी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, अंगावर खोलवर जखमा असल्याने चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी नेण्यात आले. तेथे त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे कमलापूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी गौरेश गरमडे यांनी सांगितले. विशेष म्हणजे, दोन महिन्यांपूर्वी वृद्धाच्या मुलाचे दीर्घ आजाराने निधन झाले होते. बामणकर कुटुंबावर हा दुसरा आघात झाला आहे.