वैरागड : सन २००९-१० या वर्षात ४२ लाख रूपये खर्चून कढोलीजवळ सती नदीच्या पात्रात शिवकालीन बंधाऱ्याचे बांधकाम करण्यात आले. मात्र निकृष्ठ बांधकामामुळे सदर बंधारा पहिल्याच पाण्यात वाहून गेला. या बंधाऱ्यांचे अवशेष मात्र शिल्लक आहेत. त्यांच्यामुळे नदी किनाऱ्याला धोका असल्याने सदर तुटलेला बंधारा पूर्णपणे नष्ट करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. उन्हाळ्यात कढोली परिसरात निर्माण होणारी पाणी टंचाई लक्षात घेऊन सती नदीच्या पात्रात उन्हाळ्यातही पाणी साचून राहावे, या उद्देशाने कढोली गावाजवळून वाहणाऱ्या सती नदीच्या पात्रात वैरागड-कुरखेडा मार्गावर शिवकालीन बंधारा बांधण्यात आला. या बंधाऱ्यांच्या माध्यमातून पाणी साचून राहिल्यास सभोवतालच्या गावांची पाण्याची पातळी वाढेल. नदीजवळच्या शेतकऱ्यांना दुबार पीक घेता येईल व नळ योजनांनाही पाणी उपलब्ध होईल. या उद्देशाने बंधारा बांधकामाला मंजुरी प्रदान करण्यात आली. मात्र कंत्राटदार व बांधकाम विभागाच्या चुकीच्या नियोजनामुळे बंधारा बांधकामाचा उद्देश सफल झाला नाही व निकृष्ट बांधकामामुळे बंधारा पहिल्याच पावसात वाहून गेला. नदी पात्रात तीन ते चार फूट उंचीचा काही बंधाऱ्याचा भाग शिल्लक आहे. यामुळे पुराचे पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होते. परिणामी पाणी नदीची दरड कोसळायला लागली आहे. त्यामुळे सदर बंधारा पूर्णपणे नष्ट करावा, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)
तुटलेल्या शिवकालीन बंधाऱ्याने नदी किनाऱ्याची हानी
By admin | Updated: April 30, 2016 01:26 IST