गडचिरोली : रविवारपासून सुरू झालेल्या पावसाने अद्यापही उसंत घेतली नाही. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्याच्या सर्व भागात संततधार पाऊस बरसला. गेल्या दोन दिवसांपासून चामोर्शी, कुरखेडा व भामरागड तसेच सिरोंचा या तालुक्यात पावसाचे प्रमाण अधिक आहे. संततधार पावसामुळे धान व इतर पिकांना पुरेसा पाणी पुरवठा झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून दमदार पाऊस बरसत असला तरी जिल्ह्यात कुठेही पूर परिस्थिती निर्माण झाली नाही. पावसामुळे नदी, नाले या जलस्त्रोतातील पाण्याची पातळी वाढली आहे. पावसामुळे शेतकऱ्यांनी खत टाकण्याच्या कामाला वेग घेतला आहे. सध्या गडचिरोली तालुक्यासह सर्वत्रच शेतकरी लगबगीने धान पिकाला खत टाकत असल्याचे दिसून येते. जिल्हा प्रशासनाने सोमवारी ५२६.३० मिमी पावसाची नोंद घेतली आहे. प्रशासनाने घेतलेल्या नोंदीनुसार सोमवारी गडचिरोली तालुक्यात ३५ मिमी, धानोरा तालुक्यात ४० मिमी, चामोर्शी तालुक्यात सर्वाधिक १७७ मिमी पाऊस झाला आहे. मुलचेरा तालुक्यात ३.४ मिमी, देसाईगंज २२.५ मिमी, आरमोरी २९.२ मिमी, कुरखेडा ६२.८ मिमी, कोरची ३६ मिमी, अहेरी ११ मिमी, एटापल्लीत ७.६ मिमी, भामरागड ५०.९ मिमी व सिरोंचा तालुक्यात ५०.९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. प्रशासनाने जिल्ह्यात सरासरी एकूण ४३.८५ मिमी पावसाची नोंद घेतली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
जिल्ह्यात संततधार पाऊस कायमच
By admin | Updated: September 1, 2014 23:34 IST