स्वच्छतागृहांअभावी पसरली दुर्गंधी
आरमोरी : शहरात सार्वजनिक मूत्रीघर नसल्याने जनतेने स्वत:हून काही ठिकाणी अघोषित मूत्रीघर तयार केले आहेत. त्यामुळे जवळपासचे दुकानदार व घरमालक कमालीचे त्रस्त आहेत. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतागृहे बांधणे आवश्यक आहे. अनेक ठिकाणी स्वच्छतागृहाचा अभाव असल्याने दुर्गंधी पसरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे.
सावरगाव परिसराच्या विकासाकडे दुर्लक्ष
धानोरा : छत्तीसगड व गडचिरोली जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या सावरगाव परिसरातील गावांचा विकास रखडला आहे. हा परिसर आदिवासीबहुल व नक्षल प्रभावित आहे. या ठिकाणी नेमण्यात आलेले कर्मचारी नियमित कर्तव्य बजावत नाहीत. अनेक नागरिकांना शासकीय योजनांची माहिती नाही, त्याबाबत जनजागृती करण्याची मागणी हाेत आहे.
वाकडी-बोरी मार्गावर खड्डे कायम
लखमापूर बोरी : चामोर्शी तालुक्यातील अनेक ठिकाणच्या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. वाकडी-लखमापूर बोरी मार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाले असून या रस्त्यांची अवस्था बकाल झाली आहे. वारंवार तक्रार करूनही दुरुस्तीच्या कामाकडे कानाडोळा केला आहे.
डुकरांच्या बंदोबस्ताची मोहीम थंडावली
गडचिरोली : गेल्या काही दिवसांपासून गडचिरोली शहरातील सर्व २३ वॉर्डात डुकरांचा हैदोस प्रचंड वाढला आहे. मात्र पालिकेच्या वतीने डुकरांच्या बंदोबस्ताकरिता काही महिन्यांपूर्वी हाती घेण्यात आलेली मोहीम थंडाबस्त्यात असल्याचे दिसून येते. पालिका प्रशासनाचे डुकराच्या हैदोसाकडे पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे.
देसाईगंजात गंजलेले, जीर्ण खांब बदला
देसाईगंज : नगर परिषद क्षेत्रात अनेक लोखंडी खांब वाकले आहेत. काही खांब खालच्या बाजूने जीर्ण झाले आहेत. सदर खांब कधीही कोसळण्याचा धोका आहे. सदर खांब बदलण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.