लोकमत न्यूज नेटवर्कजोगीसाखरा : शेतमालक शहरात राहत असल्याचा गैरफायदा घेत शेतकऱ्याच्या नावे बोगस प्रस्ताव तयार करून वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संगनमताने बांधावरील अपरिपक्व सागवान वृक्षाची तोड केली. शेतातील तब्बल ५५५ झाडे तोडल्याचा हा प्रकार आरमोरी वनपरिक्षेत्रातील रामपूर येथे उघडकीस आला. या प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी भूस्वामी शेतकऱ्याने केली आहे.
रामपूर येथील भूमापन क्रमांक १४४ मधील ३.७० हेक्टर आर. ही शेतजमीन वर्ग- १ची आहे. सदर जमिनीवर ३० वर्षांपूर्वी शेतकरी दिलीप मोटवानी यांनी ६०० हून अधिक झाडे लावली होती. ही झाडे मोठी झालेली होती. मोटवानी हे नागपूर येथे राहतात. याचाच गैरफायदा एका झाडे खरेदीदार ठेकेदाराने घेतला, असा आरोप केला आहे.
वनाधिकाऱ्यांवर कारवाई करावीस्वार्थापोटी वनाधिकाऱ्यांनी अधिकारांचा गैरवापर करून साग झाडे तोडली. वनाधिकारी व ठेकेदारावर शिस्तभंगाची कारवाई करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी दिलीप मोटवानी यांनी केली आहे.
तयार केली बनावट केसठेकेदाराने वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून दिलीप मोटवानी यांना कसलीच माहिती न देता व त्यांची संमती न घेता बोगस खसरा केस तयार केली.
"आरमोरी वनपरिक्षेत्र कार्यालयाचा पदभार स्वीकारण्यापूर्वीचे खसरा प्रकरण आहे. याबाबत मला काही माहिती नाही."- कैलास धोंडणे, प्रभारी वनपरिक्षेत्र अधिकारी, आरमोरी
"मी नागपूर येथे राहत असल्याचे समजताच मला विश्वासात न घेता व परवानगीशिवाय आरमोरी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी माझ्या स्वमालकीच्या शेतातील अपरिपक्व ५५५ सागवान झाडांची तोड केल्याने माझे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे."- दिलीप मोटवानी, शेतकरी