लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : एटापल्ली येथे तालुकास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवादरम्यान भररस्त्यात पाच शिक्षकांनी एकत्रित येऊन मद्यपान केल्याचा लांच्छनास्पद प्रकार समोर आला होता. याबाबत 'लोकमत'ने सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते, यानंतर चौकशी समिती नेमली. मात्र, या समितीने संबंधित शिक्षकांना क्लीन चिट दिल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. गैरवर्तन करणाऱ्या शिक्षकांची कशा पद्धतीने यंत्रणेकडून पाठराखण केली जाते, हे यामुळे समोर आले आहे.
एटापल्ली पंचायत समितीअंतर्गत तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेसह सांस्कृतिक महोत्सव २ ते ४ जानेवारीदरम्यान पार पडला. या संमेलनासाठी एकत्रित आलेल्या शिक्षकांची गट्टा रोडवरील एका झोपडीवजा गुत्त्यावर मद्यपार्टी रंगली होती. याचा व्हिडिओ व फोटो समाजमाध्यमावर प्रसारित झाले होते. ११ जानेवारीला 'लोकमत'ने वृत्त प्रकाशित केले होते. यानंतर शिक्षण विभागाने चौकशी समिती नेमली. गटशिक्षणाधिकारी हरिश बुरडकर यांनी दिलेल्या अहवालात चक्क संबंधित शिक्षकांना क्लीन चिट दिल्याची माहिती उजेडात आली आहे.
हातात दारूचे ग्लास... अजून कसले पुरावे हवेत ?व्हायरल व्हिडिओ व फोटोंमध्ये संबंधित शिक्षकांच्या गळ्यात ओळखपत्र, तसेच हातात दारूचे ग्लास दिसत आहेत. दारूबंदी असतानाही ते मद्यपान करून खिदळत असल्याचे दिसते. गटशिक्षणाधिकारी हरिश बुरडकर यांनी हे शिक्षक गैरवर्तन करताना दिसून येत नाहीत, असा अहवाल देत पाठराखण केल्याची चर्चा आहे. अजून कसले पुरावे हवेत, असा प्रश्नही आहे.
"गटशिक्षणाधिकाऱ्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. मात्र, पाचही शिक्षकांची एक वेतनवाढ रोखण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. त्यांच्यावर कारवाई निश्चितपणे होईल."- बाबासाहेब पवार, शिक्षणाधिकारी (प्रा.)