गडचिरोली : माओवाद्यांनी सुरक्षा दलांवर घातपात करण्याच्या उद्देशाने कोरचीच्या लेकूरबोडी जंगलात लपवून ठेवलेले जुनी स्फोटके जिल्हा पोलिस दलाने १६ सप्टेंबर रोजी जप्त केली. पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा धोका टाळता आला.
गोपनीय माहितीवरून कोरची पोलिस ठाण्याच्या हद्दीतील लेकूरबोडी जंगल परिसरात स्फोटक साहित्य लपवले असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे १५ सप्टेंबर रोजी पोलिस अधीक्षक गडचिरोली नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष अभियान राबवण्यात आले. सदर कारवाई विशेष अभियान पथक व बॉम्बशोधक व नाशक (बीडीडीएस) पथकाच्या जवानांनी यशस्वीपणे पार पाडली. पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी सहभागी अधिकारी व जवानांचे कौतुक केले असून, माओवाद्यांना हिंसक मार्ग सोडून आत्मसमर्पण करण्याचे आवाहन केले आहे. पोलिस अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे गडचिरोलीत मोठ्या अपघाताची शक्यता टळली आहे.
स्टीलचा डबा, सव्वाकिलो स्फोटके हस्तगत
१६ सप्टेंबर रोजी जंगल परिसरात पायी शोध घेताना पोलिस पथकाला एक संशयित ठिकाण सापडले. बॉम्ब शोधक व नाशक पथकाच्या तपासणीत त्या ठिकाणाहून पाच लिटरचा १ स्टीलचा डबा, १.२५ किलो पांढरी स्फोटक पावडर, २.५० किलो धार लावलेले लोखंडी सिंप्लटर, ०४ क्लेमोर व ०८ इलेक्ट्रिक वायर बंडल जप्त झाले.
कारवाईत यांचा सहभाग
उपअधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे, कुरखेडाचे उपअधीक्षक रवींद्र भोसले, उपनिरीक्षक प्रसाद पवार, निखिल धाबे, गणेश यलमर व जवानांनी ही कारवाई केली.