लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यातील दुर्गम भागातल्या कोणत्याही गावात जाण्यासाठी अधिकारी वर्ग सहसा हिंमत करत नाही. त्यातही वाहन जाण्यासारखा रस्ता नसेल तर तिथे जाण्याचा विचारही कोणत्या अधिकाऱ्याच्या मनात येत नाही. पण जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद (आयएएस) यांनी मात्र मंगळवारी (दि.२०) गुडघाभर पाण्यातून पायी चालत एटापल्ली तालुक्यातल्या दुर्गम गावांना भेटी देऊन तेथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या निर्माणाधीन इमारतीची पाहणी केली.आशीर्वाद यांनी आधी पिपली बुर्गी येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बांधकामाची पाहणी केली. त्या कामावर समाधान व्यक्त करत लवकरात लवकर आणि गुणवत्तापूर्ण काम करण्याचे निर्देश त्यांनी संबंधितांना दिले. त्यानंतर गावातील सरपंच व गावकऱ्यांशी चर्चा करून गावात असलेल्या समस्या सविस्तरपणे जाणून घेतल्या. त्यातील आरोग्यविषयक समस्या लवकरच दूर करण्यात येतील अशी ग्वाही गावकऱ्यांना दिली. बुर्गीनंतर सीईओ आशीर्वाद यांनी आपला मोर्चा कसनसूरकडे वळविला. मार्गात पडलेली नदी ओलांडून शेवारी मार्गे कसनसूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्राला त्यांनी भेट दिली. या दौऱ्यात त्यांच्यासोबत सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विनोद म्हशाखेत्री होते.
उपाययोजनांची जाणली स्थितीसीईओ आशीर्वाद यांनी या दौऱ्यात बालमृत्यू, रक्ताक्षयित गरोदर मातेला देण्यात येणाऱ्या गाेळ्या, विशेष अतिसार सनियंत्रण पंधरवाडा, हत्तीरोग गोळ्यांचे वाटप, संपर्क तुटणाऱ्या गावातील गरोदर मातांची स्थिती, संस्थात्मक प्रसूती, हिवतापाच्या उपाययोजना आदींबाबतची स्थिती जाणून घेऊन आरोग्य अधिकाऱ्यांना निर्देश दिले. यावेळी मानेवारा, भेद्री या उपकेंद्राचाही आढावा घेतला.