दिलीप दहेलकर लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : गेल्या दीड ते दाेन वर्षांचा कालावधी काेराेना संसर्गात गेला. दरम्यान, त्यावेळी चारचाकी, दुचाकी निर्मिती उद्याेगांसह बरेच उद्याेग प्रभावित झाले. आताही त्याचा परिणाम जाणवत आहे. अतिशय सुंदर व चांगल्या दर्जाची असलेली विदेशी कंपनीच्या चारचाकी वाहनाचे उत्पादन बंद झाले आहे. त्यातल्या त्यात सर्वच प्रकारच्याकारच्या उत्पादनाची गती कमी झाली आहे. त्यामुळेच चारचाकी खरेदी करण्यासाठी ग्राहकांना सहा महिन्यांची वाट पाहावी लागत आहे. गडचिराेली शहरात चारचाकी वाहनांची विक्री करणारे अनेक डिलर व शाेरूम आहेत. बदलत्या काळानुसार फॅशन व गरज म्हणून अनेकजण चारचाकी वाहनातून फिरताना दिसत आहेत. शिवाय शासकीय नाेकरदारांचा चारचाकी वाहनांकडे कल वाढला आहे. परिणामी शहरी भागात घराेघरी चारचाकी वाहन दिसून येत आहे. काही जण खरेदीच्या बेतात आहेत.
का मिळत नाही लवकर कार
- काेराेना काळात सर्व आर्थिक व्यवहार प्रभावित झाले. देशाचे अर्थचक्र काही प्रमाणात थांबले. दरम्यान, त्यावेळी कंपन्यांनी परवडत नसल्याच्या कारणावरून निम्मे कामगार कामावरून काढून टाकले. आता तेवढ्याच कामगारांवर उत्पादन सुरू आहे. मागणीच्या तुलनेत उत्पादन कमी आहे.
आता बुक करा, पाडव्याला मिळवा
शहरातील अनेक व्यावसायिक नवीन वर्षाच्या सुरूवातीला चारचाकी वाहन आपल्या घरी आणण्याच्या बेतात हाेते. मात्र आता बुकिंग करा व गुडीपाडव्याला कार न्या, असे डिलर त्यांना सांगत आहेत.
वेतन वाढल्याचा परिणाम- पूर्वी शिक्षक, ग्रामसेवक व तत्सम कर्मचाऱ्यांचे वेतन कमी हाेते. मात्र, शासनाकडून सहावा व सातवा वेतन आयाेग लागू झाल्याने शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात बरीच वाढ झाली. आर्थिक उत्पन्न वाढल्याने बहुतांश शासकीय कर्मचाऱ्यांकडे चारचाकी वाहन आहेत. विशेष म्हणजे, पती-पत्नी दाेघेही नाेकरी असलेल्या घरी चाकचाकी वाहन हमखास दिसून येते.
पाच ते सहा लाखांपर्यंतच्या गाड्यांना बाजारपेठेत माेठी मागणी
केवळ दाेन कंपन्यांच्या चारचाकी गाड्या तीन ते साडेतीन लाख रुपयांच्या किमतीत उपलब्ध आहेत. याशिवाय इतर कंपन्यांच्या गाड्या ७ लाख ते २५ लाखांपर्यंत आहेत. सेकंड हॅन्ड अर्थात जुन्या गाड्या अर्ध्या किमतीत गडचिराेलीच्या बाजारपेठेत उपलब्ध आहेत. मात्र, त्याचे प्रमाण फार कमी असल्याचे दिसून येते.