वाघाडेनगरमध्ये आरमोरी केंद्र शाळेमधील शिक्षका वैशाली दीपक धाईत या दुपारी शाळेत गेल्या हाेत्या. घरी कुणीही नसल्याची गोपनीय माहिती घेऊन चक्क चोरट्याने भरदुपारीच चोरी केली. चाेरट्याने दीड तोळे सोने व १५ हजार रुपये नगदी चोरल्याची माहिती मिळाली. भरवस्तीत, रहदारीचा रस्ता असूनसुद्धा भरदुपारी चोरी झाल्याने आश्चर्य व्यक्त हाेत आहे. चोरट्यांनी समोरचा दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला. त्यांनी घरामध्ये असलेल्या सर्व आलमाऱ्या फोडल्या, मात्र त्यांना जास्त सोने व पैसे हाती लागले नाही. शिक्षिका वैशाली धाईत यांनी सर्व सोने बँक लॉकरमध्ये ठेवल्याने मोठी चोरी होण्यापासून बचावले. तीन ते चार व्यक्ती असल्याचे सांगण्यात येत आहे. अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे. मागील सहा महिन्यापासून रात्रीच्या वेळी आरमोरी शहरात दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले आहे. या गेल्या सहा महिन्यात चोरट्यांनी जवळपास सहा दुचाकी लंपास केल्या आहेत. त्यात आता भरदिवसा चोरी झाल्यामुळे शहरात भीतीचे वातावरण तयार झाले आहे.
जास्त मौल्यवान वस्तू घरी ठेवू नका
ईद, दिवाळीच्या सुमारास शहरात घर फोडण्याचे प्रकार होत असताना दिसत आहेत. त्यामुळे शक्यतोवर मौल्यवान वस्तू घरी ठेवू नका. पोलिसांची गस्त रात्री दररोज होत आहे. शहरात कुणीही कॉलनी, वाॅर्डात, चौकात अनोळखी संशयित व्यक्ती आढळल्यास तात्काळ आरमोरी पोलिसांना कळविण्यात यावे, असे आवाहन आरमोरी पोलिसांनी केले आहे.