कुरखेडा : कुरखेडा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या चांदागड जिल्हा परिषद शाळेची इमारत पूर्णत: जीर्ण झाली असून ती केव्हाही कोसळू शकते. पावसाळ्यात सदर इमारत कोसळण्याचा धोका अधिक असल्याने जीवितहानी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या शैक्षणिक सत्रापूर्वी नवीन इमारतीची निर्मिती करण्याची मागणी होत आहे. तालुक्यातील चांदागड जि. प. शाळेत एक ते सात पर्यंत शिक्षणाची सोय आहे. मात्र येथील शाळेची इमारत जुनी असल्यामुळे भिंतींना भेगा पडून शाळेची मागील बाजू कोसळली आहे. पाच वर्ग खोल्यात सात वर्ग भरविण्यात येत आहेत. वर्गखोल्या कमी व वर्ग जास्त अशी शाळेची अवस्था आहे. याचा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासावर परिणाम होत आहे. शाळेची नवीन इमारत बांधण्यासाठी चांदागड ग्रामपंचायतीने ठराव पारित करून पंचायत समितीकडे पाठविला होता. मात्र अद्याप कोणाकडूनही दखल घेण्यात आली नाही. केवळ चांदागड जि. प. शाळेचीच समस्या नसून तालुक्यातील कढोली, भगवानपूर, रामगड, आंबेझरी, फरी, मालेवाडा, सिरपूर येथील जि. प. शाळांच्या इमारतीची हीच अवस्था आहे. तालुक्यातील नान्ही, बुराडी, पिपरी, चिरचाडी, सावलखेडा, गोठणगाव, मरारटोली, अंगारा, येंगलखेडा, भगवानपूर, चारभटी, दादापूर, धमदीटोला, वडेगाव, येडापूर, पुराडा,खरकाळा, धानोरी, खरमटोला, पलसगड, डोंगरगाव, गुरूनोली आदी शाळांमध्ये वर्ग खोल्याची कमतरता असून बांधकामाची मागणी वेळोवेळी करण्यात आली. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)
चांदागड शाळेची इमारत जीर्ण
By admin | Updated: May 15, 2015 01:31 IST