कृषीला यांत्रिकीकरणाचे बुस्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 11:55 PM2018-04-26T23:55:45+5:302018-04-26T23:55:45+5:30

तोट्याचा व्यवसाय बनत चाललेल्या शेतीला यांत्रिकीकरणाचे बुस्ट देण्याचे प्रयत्न कृषी विभागाच्या मार्फत केले जात आहे. उन्नत शेती, समृद्ध शेतकरी मोहिमेअंतर्गत २०१७-१८ या वर्षात ट्रॅक्टर, रोटोव्हेटर, दालमिल, कल्टीवेटर, मळणीयंत्र, पेरणीयंत्रांचे अनुदानावर वितरण करण्यात आले आहे.

Boost of mechanics for agriculture | कृषीला यांत्रिकीकरणाचे बुस्ट

कृषीला यांत्रिकीकरणाचे बुस्ट

Next
ठळक मुद्दे३८८ यंत्रांचे अनुदानावर वितरण : उन्नत शेती, समृद्ध शेतकरी अभियान

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : तोट्याचा व्यवसाय बनत चाललेल्या शेतीला यांत्रिकीकरणाचे बुस्ट देण्याचे प्रयत्न कृषी विभागाच्या मार्फत केले जात आहे. उन्नत शेती, समृद्ध शेतकरी मोहिमेअंतर्गत २०१७-१८ या वर्षात ट्रॅक्टर, रोटोव्हेटर, दालमिल, कल्टीवेटर, मळणीयंत्र, पेरणीयंत्रांचे अनुदानावर वितरण करण्यात आले आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील ९० टक्के जनता शेती व शेतीशी संबंधित उद्योगावर अवलंबून आहे. त्यामुळे येथील जनतेचा विकास करायचा असेल तर शेतीची स्थिती दुरूस्त केल्याशिवाय पर्याय नाही. गडचिरोली जिल्ह्यात प्रत्येक शेतकऱ्याकडे सरासरी शेती इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या तुलनेत अधिक असले तरी पारंपरिक पद्धतीने शेती केली जात असल्याने या शेतीतून पाहिजे तेवढे उत्पन्न मिळत नाही. परिणामी दरवर्षी तोट्याचा सामना करावा लागून शेतकरी आर्थिक अडचणीत येते.
यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून शेती केल्यास शेतीतील उत्पन्न वाढण्यास मदत होते. मात्र सदर यंत्र अतिशय महाग असल्याने शेतकरी ते खरेदी करू शकत नाही. परिणामी एखाद्या शेतकऱ्याची इच्छा असूनही तो कृषीयंत्र खरेदी करू शकत नाही. त्यामुळे शासनाने अनुदानावर कृषीयंत्र वितरित करण्याचे धोरण अवलंबिले आहे. यासाठी उन्नत शेती, समृद्ध शेतकरी ही योजना राबविली जात आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना काही कृषीयंत्रांवर अनुदान उपलब्ध करून दिले जाते.
२०१७-१८ यावर्षात सुमारे ३८८ लाभार्थ्यांना ट्रॅक्टर, रोटावेटर, दालमिल, कल्टीवेटर, मळणीयंत्र व पेरणीयंत्र वितरित करण्यात आले आहे. यावर अनुदानापोटी शासनाचे ४ कोटी २९ लाख ३० हजार रूपये खर्च झाले आहेत. कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत १७२, आर.के.व्ही.वाय. यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत ७२ व राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत १४४ शेतकऱ्यांना कृषीयंत्रांचे वितरण करण्यात आले आहे. अनुसूचित जातीच्या ३८, अनुसूचित जमातीच्या १७२ व इतर प्रवर्गाच्या १६८ शेतकऱ्यांना यंत्रांचे वितरण करण्यात आले आहे. यंत्रांच्या माध्यमातून शेती झाल्यास तोट्यात असलेली शेती फायदा देईल, अशी अपेक्षा केली जात आहे.
गडचिरोली जिल्ह्यात धानपिकाचे क्षेत्र एकूण पीक क्षेत्राच्या सुमारे ९० टक्के असल्याने धानपिकाशी संबंधितच यंत्रांचे वितरण अधिक प्रमाणात करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांना ३३८ ट्रॅक्टरचे अनुदानावर वितरण
गडचिरोली जिल्ह्यात धानाची शेती केली जाते. पारंपरिक पद्धतीमध्ये धानाची रोवणी करावी लागते. यासाठी धानाच्या बांधित चिखल करावे लागते. सदर काम नागराच्या माध्यमातून केले जाते. मात्र सदर काम अतिशय कष्टाचे आहे. बऱ्याचेळा बैल व शेतकºयाला दुखापतही होते. ट्रॅक्टरच्या माध्यमातून चिखल केल्यास ते लवकर व चांगले होते. त्याचबरोबर ट्रॅक्टरच्या सहाय्याने मळणीयंत्र, कल्टीवेटरसुद्धा चालविता येते. मात्र ट्रॅक्टर हे यंत्र अतिशय महाग असल्याने सर्वसाधारण शेतकरी खरेदी करू शकत नाही. परिणामी शेतकऱ्यांकडून ट्रॅक्टरची मागणी मोठ्या प्रमाणात करण्यात आली. त्यानुसार शासनाने सुमारे ३३८ शेतकºयांना ट्रॅक्टर मंजूर करून त्या वितरित केल्या. यामध्ये कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत १५५ टॅक्टर, आर.के.व्ही.वाय. यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत ६० ट्रॅक्टर व राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत १३३ ट्रॅक्टरचे वितरण करण्यात आले आहे.
फलोत्पादनाला चालना देण्यासाठी ३६ लाखांचे अनुदान
गडचिरोली जिल्ह्यातील वातावरण व जमीन काही प्रकारच्या फलोत्पादनासाठी योग्य असले तरी शेतकरी धानाच्या व्यतीरिक्त फलोत्पादन करण्याकडे वळला नसल्याचे दिसून येते. शेतकऱ्यांना अनुदान देऊन फलोत्पादनाकडे वळविण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत ३६ लाख रूपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. यामध्ये मिरचीचे उत्पादन घेणाºया शेतकऱ्यांना २० लाख ५० हजार, हळद पीक शेतकऱ्यांना १० लाख ४० हजार, फूल पीक उत्पादक शेतकऱ्यांना १ लाख ४० हजार व अद्रक शेती करणाºया शेतकºयांना ६० हजार रूपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. या अनुदानातून विविध साहित्य खरेदी करण्यात आले आहेत.
पाण्याची बचत करण्याच्या उद्देशाने सुक्ष्म व ठिबक सिंचन होणे आवश्यक आहे. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून १६ लाभार्थ्यांना ठिबक सिंचन संच व तुषार सिंचन संच पुरविण्यात आले आहेत. सदर संच १७ हेक्टर शेतीवर बसविण्यात आले आहेत. शेतकऱ्यांकडून या संचांची मागणी वाढत आहे.

Web Title: Boost of mechanics for agriculture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.