गडचिरोली : भारतीय कम्युनिस्ट पार्टी (माओवादी) या प्रतिबंधित पक्षातील नेतृत्व बदलानंतर केंद्रीय समिती सदस्य मल्लोजुला वेणूगोपाल राव उर्फ भूपती उर्फ सोनू याने शस्त्रसंधीचा प्रस्ताव सरकारपुढे ठेवला होता. मात्र, नेतृत्व बदलानंतर पहिल्याच प्रस्तावावरुन आता माओवाद्यांच्या वरिष्ठ नेत्यांत जुंपली आहे.
भूपतीच्या प्रस्तावाला माओवाद्यांच्या तेलंगणा राज्य समितीनेच विरोध दर्शविला आहे. तेलंगणा राज्य समिती प्रवक्ता जगन याने १९ सप्टेंबर रोजी पत्रक जारी करून भूपतीची भूमिका वैयक्तिक असल्याचा दावा केला आहे. शस्त्र ठेवणार नाही तर संघर्ष करणार, असा इशाराही त्याने दिला आहे. मे महिन्यात नक्षल नेत्यांनी पत्रक जारी करून सरकारला नक्षलविरोधी कारवाया थांबवण्याची विनंती केली होती.
यामध्ये शस्त्रसंधीसह शांतीवार्ता प्रस्ताव देखील होता. परंतु, सरकारने आधी शस्त्रे टाका, आत्मसमर्पण करा, नंतर चर्चा करु ही भूमिका घेतली. त्यानंतर छत्तीसगड, महाराष्ट्रासह दंडकारण्यातील नक्षल प्रभावित भागात सुरक्षा यंत्रणांच्या कारवाया अधिक आक्रमकपणे सुरु राहिल्या. २१ मे रोजी नक्षल चळवळीचा सर्वोच्च नेता नंबाला केशवराव उर्फ बसवराजूला छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलाने ठार केले, ज्यामुळे चळवळीतील नेत्यांना हादरा बसला. यानंतर अनेकांनी आत्मसमर्पणाची वाट निवडली. अलीकडेच नक्षल चळवळीतील नेतृत्वातही बदल करण्यात आले आहेत. सीपीआय महासचिवपदी जहाल नेता थिप्पारी तरुपती उर्फ देवजीची नियुक्ती झाली ,तर दंडकारण्याची जबाबदारी माडवी हिडमाकडे देण्यात आली. नेतृत्व बदलामुळे चळवळ कात टाकेल अशी चर्चा असताना, भूपतीने १६ सप्टेंबरला पुन्हा पत्रक जारी करून शस्त्रसंधीची विनंती केली. यावर तेलंगणा राज्य समितीकडून विरोध नोंदविला आणि भूपतीच्या विधानाला गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न असे म्हणून नाकारण्यात आले. यासंदर्भात तेलंगणा राज्य समिती प्रवक्ता जगन याने तेलुगुतून दोन पानी पत्रक १९ सप्टेंबरला जारी केले आहे.
माओवादी संघटनेतील वाद चव्हाट्यावर
तेलगू भाषिक नेते उच्चशिक्षित आणि संयमित असल्याने ते संयमाची भूमिका मांडतात, तर हिडमा आणि देवजी गट भूमिगत राहून सत्ताबदलाची प्रतीक्षा करतात. महिनाभरापूर्वी दंडकारण्यातील काही महत्त्वाच्या नेत्यांची गोपनीय बैठक झाली होती. त्यात पहिल्यांदाच तेलगू नेत्यांकडून बदलासाठी भाष्य करण्यात आले. विशेष म्हणजे, सशस्त्र बटालियनच्या बदललेल्या भूमिकेमुळे चळवळीतील अनेक नेते संभ्रमात आहेत. भूपतीच्या भूमिकेला जगनने पत्रक काढून नाकारल्याने माओवादी चळवळीत वैचारिक मतभेद उघडकीस आले आहेत. वरिष्ठ नेत्यांतील वाद चव्हाट्यावर आल्याने याचा आगामी काळात संघटनेवरही परिणाम होऊ शकतो, असे सांगितले जात आहे.