कामाचे अंदाजपत्रक बनविताना नागरिकांना किती व कशा प्रकारे उपयोग होईल याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. अंदाजपत्रकात अमक्याच्या घरापासून तमक्याच्या घरापर्यंत नालीचे अथवा सीसी रोड बांधकाम करण्याचे दर्शविण्यात येते; परंतु प्रत्यक्षात मोजमाप न करता अंदाजे लांबी टाकून त्याचे अंदाजपत्रक बनवण्यात येतात. येथील एका रस्त्याचे डांबरीकरण करण्याच्या कामाचे अंदाजपत्रक गुगल मॅपवरून बनविण्यात आले. यामध्ये लांबी ८६० मीटर दाखवण्यात आली; मात्र प्रत्यक्षात काम झाल्यानंतर मोजमाप करण्यात आले त्यावेळेस ६८० मीटर काम झाल्याचे दिसून आले. उर्वरित १८० मीटरचे काम कुठे करायचे, असा प्रश्न उपस्थित करून उर्वरित काम न केल्यास शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान होणार असल्याचे कंत्राटदारांनी यावेळी सांगितले. येथील गांधी चौकात नगरपंचायतीच्या अभियंत्यांच्या चुकीमुळे गट्टू लावल्यानंतर परत गट्टू काढून त्याठिकाणी काँक्रीटीकरण करण्यात आल्याने संबंधित कंत्राटदाराला नाहक भुर्दंड सहन करावा लागला. तसेच मुख्याधिकाऱ्यांच्या तोंडी आदेशानुसार रस्त्याची रुंदी वाढविण्यात आली यात एका कंत्राटदाराला वाढीव कामाचे देयक मंजूर करण्यात आले; मात्र ज्या कंत्राटदारांनी मुख्याधिकाऱ्यांच्या विरोधात वरिष्ठाकडे तक्रार केली त्या कंत्राटदाराची देयके निधीची उपलब्धता असतानादेखील थांबविण्यात आली आहेत, असा आरोप करण्यात आला. याशिवाय थर्डपार्टीकरिता जवळच्या एजन्सी उपलब्ध असताना जाणूनबुजून त्रास देण्याच्या उद्देशाने लांब दूरच्या एजन्सीला काम देण्यात आले आहे. थर्डपार्टीसंबंधी विचारणा करण्यास गेलेल्या येथील एका कंत्राटदारावर कार्यालयीन कामात हस्तक्षेप केला म्हणून अभियंत्याकडून पोलिसात खोटी तक्रार दाखल करण्यात आली, असेही त्यांनी सांगितले. मुख्याधिकाऱ्यांच्या अडेलतट्टू धोरणामुळे शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान होत असल्याचा आरोपही कंत्राटदारांनी यावेळी केला. यावेळी पत्रकार परिषदेला मकसूद शेख, गुणवंत फाये, धनू राऊत, खुशाल बनसोड, मुजाहिद शेख, जाकीर पठाण, जयेंद्र चंदेल, जयंत हरडे यांच्यासह अन्य कंत्राटदार उपस्थित होते. यावेळी कंत्राटदाराकडून मुख्याधिकाऱ्यांच्या अडेलतट्टू धोरणामुळे शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान होत असल्याचा आरोपही करण्यात आला.
याबाबत प्रतिक्रिया घेण्यासाठी मुख्याधिकारी नमिता बांगर यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता, नियमानुसार कंत्राटदारांची चालू देयके अदा करण्यात आली आहेत. काही अंतिम देयके त्रयस्थ परीक्षणासाठी थांबविण्यात आली आहेत. यात दुजाभाव करण्याचा आपला हेतू नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.