The Armory area in the Lok Sabha is always on the BJP side | लोकसभेत आरमोरी क्षेत्र नेहमीच भाजपच्या बाजूने
लोकसभेत आरमोरी क्षेत्र नेहमीच भाजपच्या बाजूने

ठळक मुद्देशिवसेनेचा बालेकिल्ला हरवला : प्रत्येक लोकसभेला भाजपला आघाडी

लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : आरमोरी विधानसभा क्षेत्रातील जनतेने आजपर्यंत झालेल्या अनेक लोकसभा निवडणुकीत भाजपच्या बाजूने झुकते माप दिले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी या विधानसभा क्षेत्रात भाजपचा प्रभाव नव्हताच. अशाही परिस्थितीत आरमोरी विधानसभा क्षेत्राने लोकसभेत भाजपला सातत्याने आघाडी दिली आहे. ही परंपरा याही वेळी कायम राहिल्याचे दिसून आले.
एकेकाळी आरमोरी विधानसभा क्षेत्र हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. आता मात्र हे विधानसभा क्षेत्र भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जाते. सन १९९० पासून सतत तीन वेळा या विधानसभा क्षेत्रातून शिवसेनेचा उमेदवार निवडून आला. सन २००४ मध्ये काँग्रेसने सेनेच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडले व सतत दोन वेळा या मतदार संघाने काँग्रेसच्या उमेदवाराला संधी दिली.
सन २००९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे मारोतराव कोवासे हे निवडून आले होते. तेव्हाही या क्षेत्राने भाजपचे उमेदवार अशोक नेते यांना १४ हजारपेक्षा अधिक मतांची आघाडी दिली होती. सन १९९६ पासून तर आजपर्यंत झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला झुकते माप देण्याची परंपरा या विधानसभा क्षेत्राने कायम राखली आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे अशोक नेते यांना ९० हजार ८८५ मते आरमोरी विधानसभा क्षेत्रातून मिळाली होती, तर काँग्रेसचे उमेदवार डॉ.नामदेव उसेंडी यांना ४८ हजार २०८ मते मिळाली होती. म्हणजे मोदी लाटेत २०१४ मध्ये अशोक नेते यांना आरमोरी विधानसभा क्षेत्रातून ४२ हजारपेक्षा अधिक मतांची आघाडी मिळाली होती.
सन २०१९ च्या नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत आरमोरी विधानसभा क्षेत्रातून खासदार अशोक नेते यांना ८९ हजार ५११ मते मिळाली. तर काँग्रेसचे डॉ.उसेंडी यांना ७२ हजार ३६९ मते मिळाली. यावेळी भाजपची मते थोडीफार कमी झालेली दिसतात. काँग्रेस उमेदवाराला भाजपच्या तुलनेत २०१४ च्या निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत २४ हजार पेक्षा जास्त मते मिळाल्याचे दिसून येते. मागील निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत काँग्रेसचे मताधिक्य वाढले असले तरी भाजपचे खासदार अशोक नेते यांना १७ हजारपेक्षा अधिक मतांची आघाडी या क्षेत्रातून मिळाली आहे. सदर निवडणुकीत मोदी फॅक्टर मोठ्या प्रमाणात चालला. ग्रामीण व शहरी भागातील ओबीसी पट्ट्यात काँग्रेसपेक्षा भाजपने चांगली मते घेतली. तर आदिवासीबहुल भागात काँग्रेसने चांगली मते घेतली आहेत. वंचित बहुजन आघाडीने या लोकसभा निवडणुकीत १२ हजार ७९४ अशी निर्णायक मते आरमोरी विधानसभा क्षेत्रातून घेतली.


Web Title: The Armory area in the Lok Sabha is always on the BJP side
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.