लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : येत्या १५ आणि २० जानेवारीला अशा दोन टप्प्यात होत असलेल्या ३६१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला आहे. यात ८६४२ मतदार असलेली अहेरी तालुक्यातील आलापल्ली ही जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत ठरली आहे. मुलचेरा तालुक्यातील वेंगनूर ही अवघे २४२ मतदार असलेली ग्रामपंचायत जिल्ह्यात सर्वात छोटी ग्रामपंचायत आहे. या दोन्ही ग्रामपंचायतीत दुसऱ्या टप्प्यात, अर्थात २० जानेवारीला निवडणूक होणार आहे.सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून आलापल्ली ग्रामपंचायतवर आपले वर्चस्व राहावे यासाठी सर्वच पक्ष आपापल्या परीने प्रयत्न करत असतात. गेल्यावेळी या ग्रामपंचायतवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि आदिवासी विद्यार्थी संघाचे वर्चस्व होते. यावेळीही त्याच पद्धतीने लढत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा या ग्रामपंचायतवर वर्चस्व मिळवण्यासाठी दोन्ही पक्षांच्या गटांनी कंबर कसल्याचे दिसून येते.आरमोरी तालुक्यात वैरागड, वडधा या मोठ्या ग्रामपंचायती आहेत, तर सायगाव ही सर्वात लहान ग्रामपंचायत आहे. या भागात काँग्रेस आणि भाजपच्या काऱ्यकर्त्यांमध्ये थेट लढत होण्याची शक्यता आहे. देसाईगंज तालुक्यात कुरूड ही सर्वात मोठी तर कसारी तुकूम ही सर्वात लहान ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायतींवर भाजप-काँग्रेसची सत्ता आहे. यावेळीही परंपरागत लढत होणार की अविरोध निवडणूक होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.धानोरा तालुक्यात मुरूमगाव ही सर्वात मोठी तर रेखाटोला ही सर्वात लहान ग्रामपंचायत आहे. या भागात काँग्रेस आणि भाजपच्या काऱ्यकर्त्यांमध्येच रस्सीखेच आहे. कोरची तालुक्यात बिहीटेकला या सर्वात मोठ्या ग्रामपंचायतवर काँग्रेसचे वर्चस्व होते. सर्वात लहान असलेल्या आस्वालहुडकी ग्रामपंचायतवरही काँग्रेसच्या काऱ्यकर्त्यांचेच प्राबल्य आहे. यावेळी ते कायम राहते का याकडे नागरिकांचे लक्ष राहणार आहे.चामोर्शी तालुक्यात कुनघाडा रै ही सर्वात मोठी तर मुधोली रीठ ही सर्वात लहान ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायतींवर काँग्रेसचा प्रभाव होता. यावेळी भाजप मुसंडी मारणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.