कुरखेडा : (गडचिरोली) : कधी काळी ज्याच्याशी आणाभाका घेऊन प्रेमविवाह केला, त्याच पतीचा पत्नीने प्रियकराच्या मदतीने निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना ३० डिसेंबर रोजी मध्यरात्री कुरखेडा येथे घडली. हत्येनंतर हा प्रकार अपघाताचा वाटावा म्हणून मृतदेह नदीत फेकून बनाव रचला. मात्र, रक्ताच्या थेंबांनी घटनेला वाचा फुटली अन् मारेकऱ्यांचा भंडाफोड झाला. देवानंद सूर्यभान डोंगरवार (३२, रा. गेवर्धा, ता. कुरखेडा) असे मृताचे नाव असून, त्याची पत्नी रेखा देवानंद डोंगरवार (२८) व तिचा प्रियकर विश्वभूषण उर्फ विश्वजित महेंद्र सांगोळे (३३, रा. राजोली, ता. अर्जुनी मोरगाव, जि. गोंदिया) या दोघांना पोलिसांनी जेरबंद केले आहे.
देवानंद हा मोलमजुरी करायचा, त्याने २०१८ मध्ये आंधळी (ता. कुरखेडा) येथील रेखा हिच्याशी प्रेमविवाह केला होता. सुरुवातीला सर्व काही सुरळीत होते. मात्र, त्यांना मूलबाळ होत नव्हते. कुरखेडा येथे पुलाचे काम सुरू आहे. यासाठी गेवर्धा येथे कामगारांचा कॅम्प उभारण्यात आला आहे. तेथे रेखा डोंगरवार कामगारांचा स्वयंपाक बनविण्याचे काम करत असे. या कंत्राटदार कंपनीत वाहनचालक असलेल्या विश्वभूषण सांगोळे याच्याशी तिची ओळख झाली. त्यानंतर दोघांचे प्रेमप्रकरण सुरू झाले. तीन महिन्यांपूर्वी पती देवानंदची साथ सोडून रेखा विश्वभूषणसोबत कुरखेडा येथे प्रतापनगर भागात किरायाची खोली घेऊन राहायला आली. तेव्हापासून देवानंद याच्यासोबत रेखा व तिचा प्रियकर विश्वभूषण याचा नेहमी वाद होत असे.
तंटामुक्त समितीसमोरही निघाला नाही तोडगा
देवानंदने तिला वारंवार घरी परतण्याची विनंती केली. पण, ती विश्वभूषणची साथ सोडायला तयार नव्हती. त्यामुळे त्याने गेवर्धातील तंटामुक्त समितीकडे धाव घेतली. समितीने दोघांना समोरासमोर बोलावून मध्यस्थी केली. मात्र, रेखाने पतीसोबत राहण्यास स्पष्ट नकार दिला होता. त्यामुळे देवानंद निराश झाला होता.वादाचे पर्यवसान खुनामध्ये
घटनेच्या दिवशी ३० रोजी रात्री आठ वाजता देवानंद आपल्या मित्रासोबत पत्नीला भेटण्यासाठी कुरखेडा येथील तिच्या भाड्याच्या घरी गेला होता. मात्र, त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर देवानंद रात्री दहा वाजता दुचाकीवरून एकटाच पुन्हा तिच्या घरी गेला. तेव्हा रेखा, विश्वभूषण व देवानंद यांच्यात कडाक्याचे भांडण झाले.
वाद विकोपाला गेला आणि रेखाने त्याच्यावर चाकूने सपासप वार केले, तर विश्वभूषणने फरशीच्या तुकड्याने डोक्यात प्रहार केला.यामध्ये देवानंदचा मृत्यू झाला. दोन्ही आरोपींना ३१ डिसेंबर रोजी न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. उपअधीक्षक रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनात पो. नि. महेंद्र वाघ तपास करत आहेत.
रक्ताच्या खुणांनी पोलिसांनी काढला माग
हत्या केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी रेखा व विश्वभूषण यांनी देवानंदचा मृतदेह त्याच्याच दुचाकीवरून सती नदीच्या पुलाजवळ नेला. तिथे मृतदेह फेकून दुचाकीची तोडफोड केली, जेणेकरून हा रस्ते अपघात वाटावा. मात्र, घटनेनंतर डायल ११२ वर एका व्यक्तीने कॉल करून माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तेव्हा पुलाजवळ २०० मीटरपर्यंत रक्ताचे थेंब पडलेले होते. या थेंबाचा माग काढत निघालेले पोलिस रेखा व विश्वभूषणच्या घराजवळ पोहोचले. तेथे दोघेही अंगावरील रक्ताचे डाग असलेले कपडे जाळत होते. शिवाय घराजवळील रक्ताचे डागही धुवून काढत होते, त्यानंतर दोघांनाही ताब्यात घेतले.
दोन संसार उद्ध्वस्त
दरम्यान, आरोपी विश्वभूषण हा विवाहित होता, त्याला १४ महिन्यांची मुलगी आहे. उमरेड (जि. नागपूर) ही त्याची सासूरवाडी आहे. पत्नी व चिमुकल्या मुलीला सोडून तो रेखासोबत राहात होता. प्रेम प्रकरणातून दोघांनी खुनासारखा गंभीर गुन्हा केल्याने दोन संसार उद्ध्वस्त झाले आहेत.
Web Summary : In Kurkheda, a wife and her lover murdered her husband, staging it as an accident. Blood drops led police to the crime scene, revealing the couple's attempt to cover up the brutal act. Both are arrested; two families ruined.
Web Summary : कुरखेड़ा में, एक पत्नी और उसके प्रेमी ने मिलकर पति की हत्या की और उसे दुर्घटना दिखाने की कोशिश की। खून के धब्बों ने पुलिस को अपराध स्थल तक पहुंचाया, जिससे हत्या का राज उजागर हुआ। दोनों गिरफ्तार, दो परिवार बर्बाद।