गडचिरोली : वडसा-गडचिरोली या बहुप्रतीक्षित रेल्वे मार्गासाठी गुरूवारच्या रेल्वे अर्थसंकल्पातून ९० कोटी रूपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. ४९.५ किमी लांबीच्या वडसा-गडचिरोली रेल्वे मार्गासाठी आतापर्यंत १७० कोटी रूपयांचा निधी दोन वर्षात उपलब्ध झाला आहे. या अर्थसंकल्पात ४५ कोटी रूपये हा विशेष निधी तर ४५ कोटी रूपयांचा हा ईबीआरपी अंतर्गत देण्यात आला आहे. असा एकूण ९० कोटी रूपयांचा निधी यंदा उपलब्ध झाला आहे. २०१५ मध्ये केंद्र सरकारच्या वाट्याचे ८० कोटी रूपये मिळाले होते. त्यांतर्गत वडसा-गडचिरोली रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण व जमीन अधिग्रहणाची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. १५ एकर जागा अधिग्रहण करण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनामार्फत राज्य सरकारकडे सादर करण्यात आला आहे. यंदाच्या अर्थसंकल्पातून ९० कोटी रूपये मंजूर झाल्यामुळे आगामी तीन महिन्यात प्रत्यक्ष रेल्वे मार्गाच्या कामाला सुरूवात होईल, अशी माहिती खासदार अशोक नेते यांनी दिल्ली येथून लोकमतला दिली आहे. डिसेंबर २०१५ मध्ये राज्य सरकारने २४३.६८ कोटी रूपये देण्यास मंजुरी दिली आहे. राज्याच्या आगामी अर्थसंकल्पात याबाबत राज्याच्या वाट्याची रक्कम मिळण्याची दाट शक्यता आहे.
वडसा-गडचिरोली मार्गासाठी ९० कोटी मंजूर
By admin | Updated: February 26, 2016 01:47 IST