१२६ ग्रामसभा मालामाल : ६ कोटी ६२ लाखांची मजुरी मिळणार लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : १९९६ च्या पंचायत क्षेत्र विस्तार कायदा (पेसा) अंतर्गत ग्रामसभांना तेंदूसह बांबू व इतर गौण वनोपजाची मालकी, विक्री व व्यवस्थापनाचा अधिकार शासनाने प्रदान केला. या पेसा क्षेत्रातील १७६ गावांच्या ग्रामसभांनी वन विभागाच्या नेतृत्वात २८ तेंदू युनिटची लिलाव प्रक्रिया राबविली. या प्रक्रियेतून ग्रामसभांना एकूण २५ कोटी ५३ लाख ५९ हजार ९५६ रूपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. यामुळे पाचही वन विभागातील १७६ गावे मालामाल झाली आहेत. पेसा क्षेत्रातील ग्रामसभांना गौण वनोपजाची मालकी व विक्रीचा अधिकार प्राप्त झाल्यानंतर वन विभागाने ग्रामसभांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. याशिवाय मोठ्या प्रमाणात जनजागृती राबविली. तेंदू व्यवस्थापन विक्रीबाबत ग्रामसभांना वन विभागाने प्रशिक्षण देऊन मार्गदर्शन केले. तेंदू व्यवस्थापन व विक्रीबाबत पेसा कायद्यान्वये ग्रामसभांना दोन पर्याय दिले जातात. यापैकी कोणताही एक पर्याय निवडण्याचा पूर्ण अधिकार ग्रामसभांना आहे. पर्याय दोन निवडल्यास संबंधित ग्रामसभा जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्राम पंचायतीच्या मार्गदर्शनात स्वंबळावर तेंदूची लिलाव प्रक्रिया राबवून त्याचे व्यवस्थापन व विक्री करीत असते. पर्याय दोन मध्ये वन विभाग तेंदू व्यवस्थापन व विक्रीबाबतची सर्व प्रक्रिया पार पाडते. पर्याय दोन नुसार वन विभागाने १७ एप्रिल रोजी २८ तेंदू युनिट विक्रीची आॅनलाईन निविदा उघडली. या लिलाव प्रक्रियेची दुसरी फेरी २५ एप्रिलला झाली. सर्वच तेंदू युनिट कंत्राटदारांनी खरेदी केले. पहिल्या टप्प्यात विक्री झालेल्या १८ तेंदू युनिटमधून ग्रामसभांना २० कोटी १६ हजार ९८२ तर दुसऱ्या टप्प्यात तीन युनिटमधून २ कोटी २० लाख ९२ हजार ८०१ तसेच तिसऱ्या टप्प्यातील सात तेंदू युनिटमधून ३ कोटी ३२ लाख ५० हजार १७३ रूपयांचे उत्पन्न ग्रामसभांना प्राप्त झाले. तेंदू संकलन हंगामातून हजारो मजुरांना रोजगार प्राप्त झाला आहे. तेंदू संकलनाचे काम जोमात गडचिरोली वनवृत्ताअंतर्गत जिल्ह्याच्या पाचही वन विभागाच्या गावांमध्ये तेंदू संकलनाचे काम सध्या जोमात सुरू आहे. गडचिरोलीसह बाहेर जिल्ह्यातील मजूर तेंदू संकलनाच्या कामासाठी गडचिरोली जिल्ह्यात दाखल झाले आहेत. अहेरी तालुक्यात मंगळवारपासून तेंदूपत्ता संकलनाचे काम सुरू झाले. चेरपल्ली येथील नागरिक तेंदू संकलनाच्या कामात भिडले आहेत. दुपारनंतर चेरपल्ली गावात अनेक कुटुंबीय तेंदू पुडे बांधण्याचे काम करतात. प्रमाणित गोणीनुसार मजुरी मिळणार पर्याय एक निवडलेल्या ग्रामसभांनी आॅनलाईन लिलाव प्रक्रियेद्वारे विक्री झालेल्या १८ तेंदू घटकातून १८ हजार ४५५, ३ तेंदू घटकातून २ हजार ५८५ व ७ तेंदू घटकातून ५ हजार ७१५ असे एकूण २६ हजार ७५५ प्रमाणित तेंदू गोणी इतके तेंदू संकलन होणार आहे. प्रतिगोणी २ हजार ४७५ रूपये मजुरीचा भाव मिळणार असल्याने मजुरीपोटी ६ कोटी ६२ लाख २१ हजार ६८५ रूपये मिळणार आहे. पर्याय दोनमध्ये संबंधित मजुरांना बोनस द्यावयाचा की नाही, यासंबंधीचा संपूर्ण निर्णय ग्रामसभा आपल्या स्तरावर घेत असते.
२८ तेंदू युनिटमधून २५ कोटींचा महसूल
By admin | Updated: May 11, 2017 01:42 IST