तळोधी व रेगुंठा उपसा सिंचनसाठी २७ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2020 05:00 AM2020-09-11T05:00:00+5:302020-09-11T05:00:47+5:30

जिल्ह्यातील आमदार धर्मरावबाबा आत्राम, डॉ.देवराव होळी आणि कृष्णा गजबे या आमदारांनी वेळोवेळी या विषयांबाबत पालकमंत्र्यांचे लक्ष वेधून त्यांच्याकडे मागणी केली होती. गडचिरोली जिल्हा नक्षलग्रस्त, संवेदनशील आणि ७६ टक्के वनक्षेत्राने व्यापलेला आहे. त्यामुळे सिंचन क्षमता वाढविण्यासाठी यापूर्वी चिचडोह प्रकल्प मार्गी लागला असून कोटगल प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे.

27 crore for Talodhi and Reguntha Upsa Irrigation | तळोधी व रेगुंठा उपसा सिंचनसाठी २७ कोटी

तळोधी व रेगुंठा उपसा सिंचनसाठी २७ कोटी

Next
ठळक मुद्देपुरवणी मागणीत मंजूर : नक्षलग्रस्त भागातील पोलीस विभागाच्या योजनांसाठीही तरतूद

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यातील चामोर्शी येथील तळोधी (मोकासा) व सिरोंचा येथील रेगुंठा उपसा सिंचन योजना पूर्ण करण्याकरीता पुरवणी मागणीद्वारे २७ कोटी रु पयांच्या तरतुदीला मंजुरी देण्यात आली. याशिवाय नक्षलग्रस्त भागातील पोलीस विभागाच्या योजनांसाठी ५८ कोटींची तरतूद केली. त्यातील बहुतांश वाटा गडचिरोली जिल्ह्यालाच मिळणार आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता, त्याला यश आले.
जिल्ह्यातील आमदार धर्मरावबाबा आत्राम, डॉ.देवराव होळी आणि कृष्णा गजबे या आमदारांनी वेळोवेळी या विषयांबाबत पालकमंत्र्यांचे लक्ष वेधून त्यांच्याकडे मागणी केली होती. गडचिरोली जिल्हा नक्षलग्रस्त, संवेदनशील आणि ७६ टक्के वनक्षेत्राने व्यापलेला आहे. त्यामुळे सिंचन क्षमता वाढविण्यासाठी यापूर्वी चिचडोह प्रकल्प मार्गी लागला असून कोटगल प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे.
चामोर्शी तालुक्यातील वैनगंगा नदीवर तळोधी मोकासा येथील उपसा सिंचन प्रकल्पाचे काम, तसेच सिरोंचा तालुक्यातील रेगुंठा उपसा सिंचन प्रकल्पाचे काम गतीने पूर्ण करण्याच्या दृष्टीने स्थानिक लोकप्रतिनिधींनी पालकमंत्र्यांना विनंती केली होती. ना.विजय वडेट्टीवार यांनी तळोधी उपसा सिंचनसाठी सुधारित प्रस्ताव पाठवण्याचे सूचित केले होते. त्याचे फलित म्हणून या दोन्ही प्रकल्पांसाठी एकूण २७ कोटी रु पयांची तरतूद सन २०२०-२१ च्या पुरवणी मागणीद्वारे मंजूर करण्यात आली. त्यामुळे तळोधी मोकासा प्रकल्पातील १६ गावांमध्ये ६०६२ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार आहे.
तसेच रेगुंठा प्रकल्पामुळे १७ गावातील ३२८३ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार आहे. या कामासाठी पुढे लागणारा आवश्यक निधी टप्याटप्याने उपलब्ध करून दिला जाणार असल्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

तळोधी मोकासा उपसा सिंचन योजना
नक्षलप्रवण आदिवासी भागातील चामोर्शी तालुक्यातील दर्शनीमाल गावाजवळ वैनगंगा नदीच्या डाव्या तिरावर या योजनेचे काम सुरू आहे. या योजनेची प्रस्तावित सुधारित प्रशासकिय मान्यता १५५.४५ कोटी रुपयांची आहे. चिचडोह प्रकल्प पूर्ण झाला असून त्यामुळे या योजनेचे काम पूर्ण झाल्यास यातून शाश्वत सिंचन सुरू ठेवता येणार आहे. आतापर्यंत १९ टक्के खर्च या योजनेवर झाला आहे. यात ८.३२ कोटी रुपये झालेल्या कामापैकी दिले आहेत तर २.३० कोटी देयके देणे बाकी आहेत. सदर प्रकल्पास सध्या मंजूर निधीमुळे गती मिळणार आहे. अंदाजे जून २०२२ मध्ये हा प्रकल्प कार्यान्वित करण्याचे नियोजन आहे.

रेगुंठा उपसा सिंचन योजना
सिरोंचा तालुक्यातील रेगुंठा गावाजवळ प्राणहिता नदीच्या डाव्या तिरावर या योजनेचे काम सुरू होणार आहे. सुधारीत प्रशासकिय मान्यतेसाठी या योजनेचा खर्च १०२.३६ कोटी प्रस्तावित आहे. त्यापैकी १.३७ कोटी खर्च झाला आहे. या योजनेची पूर्ण उभारणी सन २०२४ पर्यंत पूर्ण होणार आहे. यासाठी शासनाकडून टप्याटप्याने निधी वितरण होणार आहे.

Web Title: 27 crore for Talodhi and Reguntha Upsa Irrigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.