15 goats killed by toxicity | विषबाधेने १५ शेळ्या दगावल्या
विषबाधेने १५ शेळ्या दगावल्या

ठळक मुद्देचिचोली येथील घटना : दोन पशुपालक शेतकऱ्यांचे हजारोंचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्क
धानोरा : तालुका मुख्यालयापासून पाच किमी अंतरावर असलेल्या चिचोली येथे बुधवारी रात्रीच्या सुमारास दोन शेतकऱ्यांच्या घरानजीकच्या गोठ्यात बांधून ठेवलेल्या ११ शेळी व चार बकरे असे एकूण १५ पाळीव जनावरे मृत्यूमुखी पडल्याची घटना घडली.
चिचोली येथील शेतकऱ्यांनी आपल्या शेळ्या जंगलात चारायला नेल्या होत्या. सायंकाळी घरी गोठ्यात बांधून ठेवल्या. रात्री ८ वाजतापासून शेळ्यांनी आरडाओरड करायला सुरूवात केली. हा प्रकार पाहून सदर शेतकºयांनी गोठ्यात धाव घेऊन पाहिले असता, शेळ्या आरडाओरड करून दोन्ही पायावर उभ्या होऊन खाली कोसळून तडफडून मृत्यूमुखी पडत असल्याचे दिसून आले. सदर प्रकार रात्री २ वाजेपर्यंत सुरू होता. या घटनेमुळे गिरीधर गावतुरे यांच्या मालकीचे दोन बोकड सहा शेळ्या तर हरीदास जेंगठे यांच्या मालकीचे दोन बोकड, नऊ शेळ्या अशी एकूण १५ जनावरे तडफडून मृत्यूमुखी पडली. या घटनेची माहिती २० जून रोजी धानोरा पं.स.च्या पशु विभागाला देण्यात आली. तेथील पशु संवर्धन अधिकारी डॉ. डी. एम. गोल्हेर यांनी घटनास्थळी धाव घेऊन गावातील चार शेतकºयांच्या ३३ आजारी शेळ्यांची तपासणी केली. त्यानंतर त्यांनी औषधोपचार केला. शेतीला पुरक व्यवसाय म्हणून शेतकरी शेळी व बकरी पालनाचा व्यवसाय करतात. अनेक शेतकरी खरीप हंगामात शेळ्या विकून प्राप्त झालेल्या पैशातून शेतीपयोगी अवजारे व कृषी निविष्ठा खरेदी करीत असतात. परंतु चिचोली येथे सदर घटना घडल्याने दोन शेतकऱ्यांवर ऐन खरीप हंगामात आर्थिक संकट कोसळले आहे. प्रशासन व शासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी गावतुरे व जेंगठे यांनी केली आहे. सदर १५ जनावरांचा मृत्यू विषबाधेने झाल्याची माहिती पं.स.चे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. डी.एम. गोल्हेर यांनी लोकमतशी बोलताना दिली.


Web Title: 15 goats killed by toxicity
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.