सुपरस्टार ख्रिस्तियानो रोनाल्डो याच्या विक्रमाची दखल गिनिज वर्ल्ड रेकॉर्डनेही घेतली आहे. पोर्तुगालकडून २०० सामना खेळणारा पहिला खेळाडू ठरला आणि त्याची नोंद Guinness World Records मध्ये झाली आहे. २० जूनला झालेल्या युरो २०२४च्या पात्रता स्पर्धेत आईसलँडविरुद्धच्या सामन्यात रोनाल्डोने हे विक्रमाचे शिखर गाठले. त्याच्या गोलच्या जोरावर पोर्तुगालने विजय मिळवला अन् युरो २०२४मध्ये संघाचा प्रवेश पक्का केला.
रोनाल्डोला त्याच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड्सकडून एक प्रशंसापर रेकॉर्ड धारक म्हणून अधिकृत प्रमाणपत्र मिळाले. त्याला जर्सीवर २०० क्रमांक असलेला पोर्तुगालचा शर्ट देखील मिळाला. विक्रम साध्य करूनही ३८ वर्षीय रोनाल्डोने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्त होण्याची कोणतीही योजना नाही, असे सांगून जागतिक स्तरावर प्रभाव ठेवण्याच्या त्याच्या निर्धाराचा पुनरुच्चार केला.
रोनाल्डोने २००९- १८ पासून स्पॅनिश क्लब रिअल माद्रिदसोबत उत्कृष्ट खेळ केला. या काळात त्याने दोन ला लीगा, दोन स्पॅनिश चषक, चार चॅम्पियन्स लीग विजेतेपद आणि तीन क्लब विश्वचषक जिंकले आहेत. रोनाल्डोने क्लब आणि देशासाठी एकूण ८०० हून अधिक गोल केले आहेत. रोनाल्डोने युव्हेंटसमध्ये तीन वर्षात दोन सेरी ए जेतेपद आणि एक कोपा इटालिया ट्रॉफीही जिंकली.