मुंबई - रणजी करंडकाची सर्वाधिक 41 जेतेपदे नावावर असलेल्या मुंबई संघाच्या प्रशिक्षकपदाचा शोध जोरात सुरू आहे. 2017-18च्या हंगामात मुंबईला उपांत्यपूर्व फेरीत गाशा गुंडाळावा लागला होता. माजी खेळाडू समीर दिघे यांनी काही कारणास्तव प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी भारताचा माजी फिरकीपटू रमेश पोवारच्या नावाची चर्चा आहे. मुंबईच्या प्रशिक्षकपदासाठी पोवारसह विनायक सामंत आणि प्रदीप सुंदराम यांचे अर्ज आले होते. या तीन माजी खेळाडूंमध्ये 2 कसोटी आणि 31 वन डे सामने खेळणा-या पोवारचे पारडे जड मानले जात आहे. भारताचा माजी यष्टीरक्षक अजय रात्रा याला प्रशिक्षकपदाच्या मुलाखतीसाठी बोलवण्यात आलेले नाही. रात्रा मागील हंगामात पंजाबच्या संघासह होते. त्यांनीही मुंबईच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला होता. मात्र मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या नियमानुसार प्रशिक्षक हा मुंबईचाच असायला हवा. रात्राने हरयाणाकडून स्थानिक सामने खेळला आहे. मुंबईच्या प्रशिक्षकासाठी एमसीएकडे अधिक पर्याय उपलब्ध नाहीत. त्यामुळे अर्ज आलेल्यांपैकी एका नावाची लवकरच घोषणा करण्यात येईल. समीर दिघे यांनी 2017-18 च्या हंगामात ही जबाबदारी सांभाळली होती. चंद्रकांत पंडित यांच्या जागी दिघेला संधी मिळाली होती. मात्र, एमसाएचा हा निर्णय चुकीचा ठरला. मुंबईला रणजी करंडक स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत गाशा गुंडाळावा लागला होता. विजय हजारे चषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीतही संघाला हार मानावी लागली होती. 6 कसोटी आणि 23 वन डे सामने खेळणा-या दिघेंनी गत महिन्यात आपल्या पदाचा राजीनामा दिला.
फक्त दोन कसोटी सामने खेळलेला फिरकीपटू होणार मुंबईचा प्रशिक्षक?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2018 15:11 IST