लिवरपूल संघातून खेळणाऱ्या पोर्तुगालच्या स्टार फुटबॉलपटूचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. त्याच्या मृत्यूने फुटबॉल प्रेमींवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. धक्कादायक बाब म्हणजे अवघ्या १० दिवसांपूर्वीच त्याचे लग्न झाले होते.
डिओगो जोटा याच्या कारला स्पेनमध्ये अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. त्याच्यासोबत त्याचा भाऊ आंद्र देखील होता. तो देखील फुटबॉलर आहे. जोटाने १० दिवसांपूर्वीच त्याची गर्लफ्रेंड रुटे कार्डोसोसोबत पोर्टोमध्ये लग्न केले होते. २२ जूनला त्याचे लग्न झाले होते. स्पेनमधील झमोरा येथे त्याच्या कारला अपघात झाला आहे.
नेशन्स लीग स्पर्धेत पोर्तुगालने अंतिम फेरीत स्पेनला हरवून विजेतेपद पटकावले होते. नुकत्याच झालेल्या या स्पर्धेत जोटा हा विजेत्या संघात होता. ड्रिब्लिंग कौशल्यासाठी, उत्कृष्ट फिनिशिंगसाठी आणि फुटबॉल मैदानावर वेगाने बचावपटूंना मागे टाकण्याच्या क्षमतेसाठी जोटाला ओळखले जात होते. लिव्हरपूलसाठी खेळलेल्या १२३ सामन्यांमध्ये ४७ गोल केले आहेत, तर पोर्तुगाल संघासाठी त्याने ४९ सामन्यांमध्ये १४ गोल केले आहेत.