सर्वसंचारी ‘भुट्टा’ नेमका कुठला?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2021 05:56 AM2021-08-07T05:56:58+5:302021-08-07T05:59:15+5:30

Food: दणदणत्या पावसात शेगडीवर खरपूस भाजलेलं, वर तिखट-मीठ भुरभुरवून, लिंबू पिळलेलं मक्याचं गरमागरम कणीस खाण्याची मजा काही और. नाही तर निदान उकडलेलं कणीस, गेला बाजार पॉपकॉर्न.

What exactly is the omnipresent 'corn'? | सर्वसंचारी ‘भुट्टा’ नेमका कुठला?

सर्वसंचारी ‘भुट्टा’ नेमका कुठला?

Next

- मेघना सामंत
(लेखिका खाद्यसंस्कृतीच्या अभ्यासक आहेत.)
askwhy.meghana@gmail.com

दणदणत्या पावसात शेगडीवर खरपूस भाजलेलं, वर तिखट-मीठ भुरभुरवून, लिंबू पिळलेलं मक्याचं गरमागरम कणीस खाण्याची मजा काही और. नाही तर निदान उकडलेलं कणीस, गेला बाजार पॉपकॉर्न. सर्वात भारी म्हणजे इंदोरी ‘भुट्टे का कीस’ आणि पंजाबची खासियत ‘मक्की की रोटी’ कशी विसरता येईल? भारतात ठायीठायी मका आहे.
दर्यावर्दी ख्रिस्तोफर कोलंबसने १४९२ साली केलेल्या युरोप ते अमेरिका या समुद्रसफरीला अन्नाच्या इतिहासात फार महत्त्व आहे. या प्रवासाच्या आधीचा आणि त्यानंतरचा असे दोन कालखंड स्पष्ट वेगळे दिसतात इतकं जबरदस्त स्थित्यंतर कोलंबसाने घडवलं. युरोपला बटाटे, टोमॅटो, मका, शेंगदाणे, मिरच्या, चॉकलेट, आणखीही बरंच काही…
तसंच अमेरिकेला गहू, तांदूळ, ऊस, केळी अशा पिकांचा परिचय कोलंबसाने करून दिला; हे सगळं त्याने आधी ठरवलं नव्हतं, पण त्याच्या सफरीतून प्रेरणा घेऊन अनेक प्रवाशांकडून ते होत गेलं. याला ‘कोलंबियन एक्सचेंज’ असं म्हणतात. मका उगवायचा अँडीज पर्वताच्या पायथ्याशी. दक्षिण अमेरिकेत. तिथून तो हजारो वर्षांपूर्वी उत्तर अमेरिकेत पोहोचला. तिथले मूळ रहिवासी जमीन न नांगरताच त्याचं पीक घ्यायचे. नैसर्गिकरीत्या त्याची नवीन वाणं तयार होत गेली, जी कोलंबियन एक्सचेंजमार्फत युरोपात आणि पोर्तुगीजांमार्फत भारतात शिरली.
मका रुजला शेतात, आहारातही. हिमालयाच्या रांगांपासून दक्षिण भारतापर्यंत सर्वसंचारी आहे तो. आपल्याकडे ऋषीपंचमीच्या भाजीतही घालतात; पण वनस्पतीशास्त्रज्ञांच्या मते तो जेमतेम चारशे वर्षांपूर्वीचा, तोही परकीयांकडून आलेला. आता यात एक गंमत आहे. अन्नाचा पुरातत्त्वीय अंगाने वेध घेणारे संशोधक म्हणतात की मका कधीपासून आपल्याकडे होता ! पुरावे आहेत. कर्नाटकातल्या काही (बेलूर इ.) दगडी देवालयांमध्ये मक्याची कणसं शिल्पित झालेली आढळतात. हुबेहूब. या शिल्पांचं वय आठशे-साडेआठशे वर्षं. म्हणजे कोलंबसाच्या देशाटनाच्याही कित्येक शतकं आधीच. शिवाय ‘मका’ हे नाव संस्कृत ‘महाकाय’ या शब्दावरून पडलं अशीही उत्पत्ती सांगतात. तर संशोधनाच्या क्षेत्रात मक्याच्या भारतीयत्वावरून तावातावाने वाद चालू असतो. कणसावर ताव मारताना तोंडी लावायला छान असतो तो.  (पूर्वार्ध)

Web Title: What exactly is the omnipresent 'corn'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :foodअन्न