'फील गुड' अनुभवायचंय? केक खा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2024 13:40 IST2024-12-15T13:40:33+5:302024-12-15T13:40:45+5:30
ट्रेण्ड काहीही असो, आपला आब न सोडणारा. आजूबाजूच्या सप्तरंगी केक गर्दीत पण लक्ष वेधून घेणारा असतो. नाताळ जवळ येत चालला आहे, केक तयारी जोरात आहे.

'फील गुड' अनुभवायचंय? केक खा!
शुभा प्रभू साटम, खाद्यसंस्कृती अभ्यासक
लोकांना ब्रेड मिळत नाही? त्यांनी केक खावा. फ्रेंच राणीचे प्रसिद्ध उद्गार.
केक हे श्रीमंत अभिजात लोकांचे खाणे असे वलय या पदार्थाला मिळाले आहे आणि नेहमीप्रमाणे या पदार्थाचा उगम युरोप, इंग्लंड अशा देशात झाला असा समज बहुतांशी लोकांचा. तर केक मूळ वरील प्रांतात नाही तर इजिप्तमध्ये तयार झाला किंवा उगम पावला. केका या मूळ शब्दापासून केक शब्द प्रचलित झाला. केकचा पूर्वज गुबगुबीत नव्हता. साधारण नान पराठ्यासारखा किंचित फुगलेला. गोडव्यासाठी मध आणि भरपूर सुकामेवा. क्वचित दालचिनी/ जायफळ असे मसाले, तो फुगावा यासाठी यीस्ट. प्राचीन रोमन साम्राज्यात पण केक जन्माला आला, असा मतप्रवाह आहे. त्या सुमारास साखर तशी दुर्मीळ, त्यामुळे मध वापरला जायचा.
गंमत म्हणजे यावेळी फक्त गोड नव्हे तर मसालेदार केक पण केले जायचे. हे साधारण चौथ्या दशकात. हळूहळू मध्ययुगात जसजसा व्यापार उदीम वाढला, तसतसे देशाबाहेरील पदार्थ मिळू लागले, ज्यात मुख्य होती साखर. साखरेचा गोडवा अधिक असल्याने तिला पसंती मिळाली. केक आधी गव्हाच्या पिठापासून व्हायचे. नंतर मैदा आला. अर्थात घटक पदार्थ बदलत गेले तरी कृतीत फार फरक पडला नाही. भट्टीत भाजणे. मुळात आदिमानव आगीवर कंदमुळे भाजून खायचा. स्वयंपाकाची आदिम पद्धत म्हणू शकतो. ती अर्थात आजही आपण सोडली नाही. तर केक पण भाजला जायचा. वरून मग काय माल मसाला पडायचा तो स्थानिक पद्धतीनुसार.
हे केक अगदी बेसिक म्हणू शकतो. म्हणजे वरून क्रीम, रंग, सजावट असे नसायचे. इजिप्तमध्ये यात रवा, अंडी भरपूर जायची. जरदाळू मुख्य घटक. आपण जशी देवाला खीर किंवा पक्वान्न प्रसाद म्हणून अर्पण करतो, तसे प्राचीन इजिप्तमध्ये केले जायचे. इंग्रजीत ज्याला सेक्रेड फूड म्हटले जाते तसे. याच सुमारास रोमन साम्राज्य अस्तंगत झाले, अनेक राजकीय, भौगोलिक उलथापालथी झाल्या आणि हळूहळू केक हे श्रीमंत वर्गाचे खाणे म्हणून प्रसिद्ध झाले.
आधीचे केक तसे घट्ट असायचे, थोडे कडक. हळूहळू त्याचा पोत जाळीदार होत गेला. व्यापार उदीम वाढला, दळणवळण विस्तारले, प्रवासी येऊ जाऊ लागले, व्यापारी वेगवेगळे माल जगभरातून आणू लागले. आणि केक मूळ कृतीत स्वादिष्ट भर पडत गेली. कोको, केकमध्ये घातला जाऊ लागला आणि चॉकलेट केक अवतरला. हरहुन्नरी खानसामे वेगवेगळे पदार्थ घालून केक चव द्विगुणित करू लागले. केक भाजण्याच्या कृतीत पण बदल आले.
केकचे मूळ रूप आता पूर्ण बदलले आहे. मैदा/ कणीक, अंडी, सुका मेवा, मध या चार खांबावर तोललेली केक कृती विस्तारली. आजच्या घडीला शब्दशः हजारो प्रकारचे केक दिसतील. माणसाच्या कल्पनेला लगाम नसतो. त्यातून मग खाद्यपदार्थात बदल होत राहतात. काही भर पडते, काही गोष्टींना पर्याय मिळतो, काही गोष्टी वापरणे कमी होते. पूर्वी काय असायचे की चव हा मुद्दा मुख्य होता. तेव्हा केक पवित्र शक्तींना प्रसाद म्हणून दिला जायचा. मग त्यात खच्चून सर्व असायचे. आता केक चवदार असून पुरत नाही, तर तो दिसायला पण देखणा हवा. आयसिंग, फोंडाट असे प्रकार या दृष्टी सौख्यामुळे रूढ झाले. एके काळी उच्च वर्गाचा अधिकार असणारा हा पदार्थ घरघरांत पोहोचलाय. पुन्हा बजेट असेल तसा पुरवठा असतो. काही शे रुपयांपासून ते लाख रुपयांपर्यंत किमती असतात. आणि वाढदिवस ते बारसे प्रत्येक प्रसंगी केक असणारच इतका हा पदार्थ अविभाज्य घटक झालाय.
दिवाळीत करंजी, चकली हवी तसा नाताळ मधे केक असायलाच हवा. डिसेंबरमध्ये येणाऱ्या या सणाची तयारी नोव्हेंबरपासून सुरू होते. इथे मात्र एक गोष्ट आवर्जून नमूद करावीशी वाटते. अस्सल ख्रिसमस केकवर आयसिंग नसते. बँडी/ वाइनमध्ये फुगून टपोरा झालेला सुकामेवा, मध/ साखर माफक, जायफळ पूड मुख्य. आणि हो, दिसायला घट्ट पणं अगदी मुलायम पोताचा पारंपरिक नाताळ केक आपला रुबाब टिकवून आहे. वेगवेगळे ड्रेस, दागिने घातलेल्या गर्दीत एखादी व्यक्ती आपल्या साध्या खानदानी रुबाबामुळे कशी उठून दिसते तसाच हा नाताळ केक. जाता जाता... तुमचा दिवस बेकार गेलाय, काही ताण आहे, अशावेळी स्टेशनवरील केक खाऊन बघा, स्वानुभव आहे. फील गुड वाटते नक्की.
ट्रेण्ड काहीही असो, आपला आब न सोडणारा. आजूबाजूच्या सप्तरंगी केक गर्दीत पण लक्ष वेधून घेणारा असतो. नाताळ जवळ येत चालला आहे, केक तयारी जोरात आहे.
वातावरण मस्त, सणाचा एक आनंद, आप्तेष्ट, मित्र यांच्यासोबत गप्पा मारताना असा केक पेश होतो. परंपरेनुसार त्यावर रम / बँडी ओतून पेटवले जाते. महिनाभर वारुणीमध्ये डुंबून तृप्त झालेला सुकामेवा खडबडून जागा होतो.
मंद उजेडात निळ्या ज्वालांचा पेहराव लेवून केक समोर येतो. पाहुण्यांना दिला जातो. त्याचा गोडवा, जायफळ आणि अन्य मसाल्यांचा स्वाद नकळत जिभेवर पसरत जातो.