अस्सल भारतीय केकची कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2021 05:30 AM2021-06-05T05:30:42+5:302021-06-05T05:31:20+5:30

भारतात अर्थातच ब्रिटिशांसोबत केकने शिरकाव केला. साम्राज्याच्या विस्ताराबरोबर ब्रिटिशांची केकची मागणी वाढली. ब्रिटिशांच्या बेकऱ्या सुरू झाल्या. मात्र भारतातला पहिला ख्रिसमस केक बनवण्याचं श्रेय केरळच्या बेकरीकडे जातं.

The story of an authentic Indian cake | अस्सल भारतीय केकची कहाणी

अस्सल भारतीय केकची कहाणी

googlenewsNext

केकने माणसाला एवढी भुरळ पाडली की देशोदेशी तो शुभप्रसंगी करण्याचा पदार्थ म्हणून लोकप्रिय होत गेला. स्थानिक उपलब्धतेनुसार मलई, चीज, फळं इत्यादींची भर पडत गेल्याने केकच्या लक्षावधी पाककृती निर्माण झाल्या.

भारतात अर्थातच ब्रिटिशांसोबत केकने शिरकाव केला. साम्राज्याच्या विस्ताराबरोबर ब्रिटिशांची केकची मागणी वाढली. ब्रिटिशांच्या बेकऱ्या सुरू झाल्या. मात्र भारतातला पहिला ख्रिसमस केक बनवण्याचं श्रेय केरळच्या बेकरीकडे जातं. तलाश्शेरी नावाच्या किनारी गावात १८८० साली माम्बळ्ळी बापू नावाच्या उद्योगी गृहस्थाने पहिली देशी बेकरी सुरू केली. 

बेकिंगची कला ते ब्रह्मदेशात शिकले होते. आपल्या ‘रॉयल बिस्किट फॅक्टरी’मध्ये ते चाळीस प्रकारची बिस्किटं, ब्रेड, टोस्ट वगैरे भाजत असत; पण केक नव्हता भाजला कधी. अशात मरडॉक ब्राऊन नामक ब्रिटिश मळेमालक त्यांच्या दुकानी अवतरला. त्याने इंग्लंडहून एक ख्रिसमस केक आणला होता, तो नमुन्यादाखल खायला देऊन त्याने तस्साच केक बनवून दाखवणार का? असं बापूंना विचारलं. ब्राऊन स्वतः दालचिनीची लागवड करणारा. त्याने त्यांना पद्धत समजावली; सुका मेवा, कोको अशी सामग्री देऊ केली. परंतु बापूंचा स्वतःच्या कौशल्यावर विश्वास होता. आधी त्यांनी केकचं भांडं गावातल्या लोहाराकडून घडवून घेतलं. खास केरळातली वेलची, दालचिनी निवडून घेतली. केकचं मिश्रण मुरवण्यासाठी ब्राऊनने सुचवलेली फ्रेंच ब्रँडी न वापरता माम्बळ्ळी बापूंनी चक्क वापरली काजूची फेणी. त्यांनी ख्रिसमसच्या चार दिवस आधी हा केक ब्राऊनसमोर पेश केला. अस्सल भारतीय चवीचा तो केक चाखताच ब्राऊन वेडा झाला. त्याने ताबडतोब वीस केक्सची मागणी नोंदवली. रॉयल बिस्किट फॅक्टरीचं नाव सर्वतोमुखी झालं. 

केकचं समीकरण भारतात तरी सुरुवातीला ख्रिश्चन धर्माशी जुळलेलं होतं; पण हळूहळू सर्वांनी त्याला स्वीकारलं. या केकच्या कृतीमध्ये आणखी एक भारतीय आविष्कार घडून आला, तो म्हणजे बिनअंड्याचा केक. दही, यीस्ट, मार्जरीन अथवा अधिक मात्रेत बेकिंग पावडर, कधी साय, दूध, कंडेन्स्ड मिल्क असे पर्याय वापरून एतद्देशीयांनी केकला एक नवा साज चढवला. ज्यामुळे, अधिकाधिक भारतीय लोकांना केक आपलासा वाटू लागलाय.

- मेघना सामंत, (लेखिका खाद्यसंस्कृतीच्या अभ्यासक आहेत.)
askwhy.meghana@gmail.com

Web Title: The story of an authentic Indian cake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.