खामेनेईंच्या मृत्यूवर फरहाना भटने व्यक्त केलं दु:ख, भडकला हिना खानचा नवरा; म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 09:53 IST2026-03-03T09:33:47+5:302026-03-03T09:53:46+5:30
जे तुमचं रक्षण करतात, त्यांच्याच पाठीत तुम्ही खंजीर खुपसता? रॉकी जैस्वालने चांगलंच सुनावलं

खामेनेईंच्या मृत्यूवर फरहाना भटने व्यक्त केलं दु:ख, भडकला हिना खानचा नवरा; म्हणाला...
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेईंच्या मृत्यूनंतर 'बिग बॉस १९' फेम फरहाना भट्ट हिने व्यक्त केलेल्या दुःखावर आता जोरदार टीका होत आहे. टीव्ही अभिनेत्री हिना खानचा पती रॉकी जैस्वाल याने या प्रकरणावर नाव न घेता एक खरमरीत पोस्ट शेअर केली आहे. "जो देश तुमचे रक्षण करतो, त्याच्याच पाठीत तुम्ही खंजीर खुपसता आणि देशाच्या विरोधात उभ्या असलेल्या परकीय नेत्यासाठी शोक साजरा करता" अशा शब्दांत रॉकीने आपली नाराजी व्यक्त केली आहे.
काय आहे रॉकी जैस्वालची पोस्ट
हिना खानचा पती रॉकी जैस्वालने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत लिहिले, "जोपर्यंत एखादी गोष्ट खाजगीत असते, तोपर्यंत कोण कोणासाठी शोक व्यक्त करतंय याच्याशी मला काही देणंघेणं नसतं. पण जेव्हा तुम्ही हे सार्वजनिकपणे करता, तेव्हा तुम्ही स्वतःहून लोकांना टीका करण्याचं निमंत्रण देता. मी या शोक व्यक्त करणाऱ्यांना कधीही एखाद्या भारतीयासाठी इतकं प्रेम व्यक्त करताना किंवा अश्रू गाळताना पाहिलं नाही. ना सैनिकांसाठी, ना दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी, ना सरकारसाठी, ना पोलिसांसाठी आणि ना महान एपीजे अब्दुल कलाम यांच्यासाठी!"
तो पुढे लिहितो, "जे तुमचं रक्षण करतात, त्यांच्याच पाठीत तुम्ही खंजीर खुपसता आणि जो तुमच्या देशाच्या विरोधात उभा आहे, अशा परकीयासाठी शोक व्यक्त करता? निष्ठा सर्वकाही असते आणि तुमच्या निष्ठेवरूनच सर्व काही स्पष्ट होतं."

काय म्हणालेली फरहाना भट?
खामेनेईंच्या मृत्यूवर फरहान भटने प्रतिक्रिया देत दु:ख व्यक्त केलं होतं. ती म्हणालेली, "खामेनी हे असे व्यक्तिमत्त्व होते ज्यांना आम्ही कधीही विसरू शकणार नाही. या घटनेमुळे संपूर्ण काश्मीर हादरले असून मला स्वतःला सेहरीनंतर अजिबात झोप लागली नाही. मी खूप दुखी आहे."
भारतातील विविध राज्यांमध्ये निदर्शनं
खामेनेई यांच्या मृत्यूचे पडसाद भारतातही उमटल्याचं पाहायला मिळतंय. लखनऊ, हैदराबाद आणि बंगळुरू यांसारख्या शहरांमध्ये या घटनेच्या निषेधार्थ मोठ्या प्रमाणावर निदर्शने करण्यात आली. शिया मुस्लीम समुदायातील लोक रस्त्यावर उतरले असून त्यांनी आपला संताप आणि दुःख व्यक्त केले. मात्र, याच मुद्द्यावरून आता भारतीय सेलिब्रिटींमध्येही वैचारिक युद्ध सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे.