"तो म्हणालेला तू मला आवडतेस...", राहुल वैद्यसोबतच्या रिलेशनशिपवर प्राजक्ता शुक्रेचा गौप्यस्फोट, म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 10:29 IST2026-05-04T10:28:52+5:302026-05-04T10:29:34+5:30
राहुल वैद्य आणि प्राजक्ता शुक्रे 'इंडियन आयडल १'मुळे प्रसिद्धीझोतात आले. या शोनंतर त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगल्या होत्या. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत प्राजक्ताने राहुल वैद्यसोबतच्या रिलेशनशिपवर भाष्य केलं आहे.

"तो म्हणालेला तू मला आवडतेस...", राहुल वैद्यसोबतच्या रिलेशनशिपवर प्राजक्ता शुक्रेचा गौप्यस्फोट, म्हणाली...
'बिग बॉस मराठी' फेम प्राजक्ता शुक्रे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. 'इंडियन आयडल १' या पहिल्या रिएलिटी सिंगिंग शोने अनेक नव्या चेहऱ्यांना ओळख मिळवून दिली. यापैकीच एक म्हणजे प्राजक्ता शुक्रे. या पर्वात अनेक मराठी चेहरेही दिसले होते. राहुल वैद्य आणि प्राजक्ता शुक्रेही 'इंडियन आयडल १'मुळे प्रसिद्धीझोतात आले. या शोनंतर त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगल्या होत्या. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत प्राजक्ताने राहुल वैद्यसोबतच्या रिलेशनशिपवर भाष्य केलं आहे.
प्राजक्ता शुक्रेने नुकतंच सिद्धार्थ कननला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला राहुल वैद्यसोबतच्या रिलेशनशिपबाबत विचारण्यात आलं. प्राजक्ता खुलासा करत म्हणाली, "त्या वयात जर कोणी आपल्याला महत्त्व देत असेल, तर चांगलं वाटतं. तो मला चांगला वाटायचा आणि ते वयही तसंच होतं. तो जर बोलायला लागला तर खूप बोलतो. पण, आम्ही खूप लहान होतो आणि दोघांनाही अक्कल नव्हती. आम्ही काहीच ठरवलं नव्हतं. तो मला म्हणाला होता की तू खूप चांगली आहेस. आणि मला खूप आवडतेस. आता मी इथेच थांबतो. मीदेखील त्याला म्हणाले होते की तू सुद्धा माणूस म्हणून खूप चांगला आहेस आणि उत्तम गायक आहेस. आम्ही रिलेशनशिपमध्ये होतो असं नाही म्हणणार... पण, त्यावेळी आम्ही एकत्र काम करत होतो".
"तो एका वेडिंग शोमध्ये जायचा. पण, मी तसे शो करायचे नाही. एकदा आम्ही एका वेडिंग शोमध्ये गेलेलो. पण, कुणाचं लक्ष नव्हतं...त्यावेळी माझं असं झालं, जर कुणाला ऐकायचंच नाहीये तर बोलावलं का? त्याचा माझ्या बालमनावर खूप खोलवर परिणाम झाला. एकमेकांपासून लांब जाण्याचा आमचा कोणताही हेतू नव्हता. त्यावेळी आम्ही मोठे होत होतो. त्यानंतर मला जाणवलं की आमच्यात खूपच फरक आहे".
दरम्यान, प्राजक्ता 'बिग बॉस मराठी ६'मध्ये सहभागी झाली होती. सुरुवातीला तिचा खेळ खूप चांगला होता. मात्र नंतर खेळ मागे पडल्याने तिला घराबाहेर जावं लागलं. प्राजक्ता अद्यापही सिंगल आहे. तर राहुल वैद्यने दिशा परमारसोबत लग्न करत संसार थाटला आहे. त्यांना एक मुलगीदेखील आहे.